पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनलेले आहेत. त्याचेच पडसाद सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उमटत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याला थेट आव्हान दिलं आहे. तसेच समोरासमोर येऊन बोलण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर पठाणनेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
इरफान पठाण याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यानच्या आठवणींना उजाळा देताना आपल्यात आणि शाहिद आफ्रिदीमध्ये एकदा वाकयुद्ध झालं होतं, असे सांगितले होते. त्याबाबत विचारलं असता शाहिद आफ्रिदीने इरफान पठाणने केलेला हा दावा फेटाळून लावला. तसेच इरफान पठाणाला समोरासमोर येऊन बोलण्याचं आव्हानही दिलं. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, जो समोर येऊन उभा राहून बोलतो, त्यालाच मी मर्द मानतो. पाठीमागून खूप काही बोललं जातं. मात्र सो समोर येऊन बोलतो, त्यालाच मी मानतो. समोरासमोर बोलणं झाल्यावर उत्तरही देता येईल, असे त्याने सांगितले.
इरफान पठाणने २००६ मध्ये झालेल्या पाकिस्तान दौऱ्यावेळी घडलेल्या घटनेची आठवण सांगितली होती. तो म्हणाला होता की,’’२००६ च्या दौऱ्यात आम्ही कराचीहून लाहोरला जात होतो. दोन्ही संघ एकत्रच प्रवास करत होतो. तेव्हा आफ्रिदी माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या डोक्यावरचे केस विस्कटले. तसेच मी कसा आहे, अशी विचारणा केली’’.
पठाण पुढे म्हणाला की, त्यावेळी अब्दुल रझाक माझ्यासोबत बसला होता. मी त्याला विचारले की, इथे कोणकोणत्या प्रकारचं मांस उपलब्ध आहे. तेव्हा त्याने मला सांगितले की, इथे वेगवेगळ्या प्राण्यांचं मांस मिळतं. तेव्हा इथे कुत्र्याचंही मांस मिळतं का? असं मी त्याला विचारलं. तेव्हा तो अवाक् झाला. मी असं का विचारलं, असा प्रश्न त्याने केला. तेव्हा मी आफ्रिदीकडे बोट दाखवून म्हणालो की, याने कुत्र्यांचं मांस खाल्लंय, त्यामुळे तो त्याच्यासारखा भुंकतोय.
मात्र आफ्रिदीने अशा प्रकारचं काही वाकयुद्ध झाल्याचा इरफान पठाणने केलेला दावा फेटाळून लावला आहे. तसेच अब्दुल रझाकनेही, असं काही घडलं नसल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता इरफान पठाणनेही आफ्रिदीला प्रत्युत्तर दिलं असून, तुम्ही लोक बरोबर बोलताय. आपल्या शेजारील देशातील माजी खेळाडू इरफान पठाणच्या नावाने त्रस्त आहेत, असा टोला त्याने लगावला.