आशिया कपची फायनल ती ही भारत-पाकिस्तानमधील, रविवारची रात्र आणि नवरात्र गरबा असे वेगळेच समीकरण काल जुळून आले होते. आयोजकांनी हा क्रिकेट सामना पाहण्यासाठी मोठी स्क्रीनची व्यवस्था केली होती. पाकिस्तानची फलंदाजी सुरु होती आणि ती पाहत लोक गरबा खेळण्याची मजा घेत होते, पाकिस्तानच्या धडाधड विकेट पडू लागल्या आणि दांडिया भलताच रंगात आला होता. पण भारताचे लागोपाठ तीन विकेट पडले आणि गरब्याची रयाच गेली होती. गरबा खेळायचे सोडून लोक सिरिअस होऊन सामना पाहू लागले होते. शेवटच्या षटकात सगळा सामना फिरला आणि मग पुन्हा दांडियाची धूम सुरु झाली होती.
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
भारताने गमावलेला सामना खेचून आणला होता. पहिले तीन विकेट जाताच लोकांनी आपण आता हरतोय की काय असे म्हणत अवसान गाळले होते. कुठेतरी चमत्कार होईल म्हणून अनेकजण हा सामना पाहू लागले होते. अशीच परिस्थिती गरबा इव्हेंटमध्ये देखील होती. सुरुवातीला तिलक आणि संजूने भारताची पडती बाजू सावरली, संजू बाद झाला आणि शिवम दुबे आला. त्याने तिलकच्या साथीने ऐन मोक्याच्या क्षणी पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला आणि सामना जिंकण्याच्या टप्प्यात आणला परंतू १० रन्स हवे असताना तो देखील बाद झाला. घरात असलेल्यांचीच नाही तर गरबा नाईटला खेळायला गेलेल्यांची देखील धाकधूक वाढली होती.
तेथील ढोल, ताशेही वाजायचे थांबले होते. परंतू, जेव्हा भारत विजयाच्या टप्प्यात आल्याचे समजले तेव्हा ढोल, ताशे वाजविणारे देखील जोशाने पेटून उठले. नाचून हात-पाय दुखत असलेले देखील विजयाच्या आवेशाने पुन्हा नाचू लागले होते. या सामन्याने अनेकांची गरबा नाईट मात्र अविस्मरणीय करून टाकली होती.