दुबई: पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरमुळे गाजलेल्या यंदाच्या आशियाई स्पर्धेत अंतिम सामना काही तासांतच सुरु होणार आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी या स्पर्धेत एकदा, दोनदा नाही तर तीनदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ही तिसरी लढत आज होत आहे. या लढतीनंतर विजेत्या संघाला जे बक्षीस मिळणार आहे, त्याचीही चर्चा होत आहे.
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना हा केवळ क्रिकेटचा थरारच नाही, तर स्पर्धेतील वाढलेल्या बक्षीस रकमेमुळेही चर्चेत आहे. यंदाच्या विजेत्या संघाला मागील स्पर्धेच्या तुलनेत तब्बल ५०% अधिक रक्कम मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वर्षी आशिया कपचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला २.६ कोटी रुपये (सुमारे ३ लाख अमेरिकन डॉलर्स) मिळणार आहेत. ही रक्कम मागील आशिया कपच्या तुलनेत खूप जास्त आहे. उपविजेत्या संघालाही मोठी रक्कम मिळणार असून, त्यांना १.३ कोटी रुपये दिले जातील.
या स्पर्धेत वैयक्तिक कामगिरीसाठीही मोठी रक्कम देण्यात येणार आहे. 'प्लेअर ऑफ द सिरीज' ठरणाऱ्या खेळाडूला १२.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. सध्या भारताचा अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव तसेच पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी हे या पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
जरी आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) या रकमेची अधिकृत घोषणा केलेली नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी ही फायनल केवळ ट्रॉफी जिंकण्याची संधी नाही, तर इज्जतीचा प्रश्न आहे. त्यातच ही करोडोंची रक्कम म्हणजे एक प्रकारे बोनसच असणार आहे.