रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवत या स्पर्धेतील विजयी घोडदौड सुरू ठेवली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकता दाखवत भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने आपला हेतू स्पष्ट केला. त्याने अवघ्या ३९ चेंडूत ७४ धावा करत भारताच्या विजयाचा पाया रचला. या वादळी खेळीदरम्यान अभिषेक शर्माच्या नावावर विश्वविक्रम नोंदवण्यात आला. तसेच त्याने भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगचाही विक्रम मोडीत काढला.
अभिषेक शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये सर्वात जलद ५० षटकार मारणारा फलंदाज ठरला. त्याने फक्त ३३१ चेंडूंमध्ये ही कामगिरी केली. त्याने वेस्ट इंडिजच्या एविन लुईसचा विश्वविक्रम मोडला, ज्याने ३६६ चेंडूंत ५० षटकार मारले. या यादीत आंद्रे रसेल तिसऱ्या, हजरतुल्लाह झझाई चौथ्या आणि सुर्यकुमार यादव पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५० पेक्षा कमी चेंडूंमध्ये ५० षटकार मारणारा अभिषेक हा पहिला फलंदाज आहे.
युवराज सिंगला टाकले मागे
अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. २४ चेंडूंमध्ये अर्धशतक मारून अभिषेकने भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगचा विक्रम मोडला. २०१२ मध्ये अहमदाबाद टी-२० मध्ये पाकिस्तानी संघाविरुद्ध युवराजने २९ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम मोहम्मद हाफिजच्या नावावर आहे. २०१२ मध्ये अहमदाबादमध्ये हाफिजने २३ चेंडूत अर्धशतक झळकावले.
Web Title: Asia Cup 2025: abhishek sharma create History, Breaks yuvraj singh records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.