जागतिक क्रिकेटमधील महत्त्वाच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. २८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना क्रिकेटप्रेमींसाठी खास आकर्षण करणार आहे. आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ याआधी अनेकदा आमने सामने आलेले आहेत. तसेच दोन्ही संघांमध्ये अत्यंत अटीतटीचे सामनेही रंगलेले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांचे पडसाद मैदानावर सामना सुरू असताना खेळाडूंवरही उमटल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. २०१० साली आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला सामना हा हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यातील जुगलबंदीमुळे चांगलाच गाजला होता.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सलमान बटच्या आक्रमक ७४ धावांच्या खेळीच्या जोरावर २६७ धावा कुटल्या होत्या. पाकिस्तानकडून सलमान बटने ७४ धावांची खेळी केली. तर कामरान अकमल यानेही अर्धशतक ठोकले होते. प्रत्युत्तरदाखल गौतम गंभीर आणि कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा सहजपणे पाठलाग सुरू केला. मात्र गौतम गंभीर, महेंद्र सिंग धोनी आणि रवींद्र जडेजा बाद झाल्यानंतर परिस्थिती बदलली. अखेरच्या २९ चेंडूत भारताला विजयासाठी ४९ धावांची आवश्यकता होती अशा परिस्थितीत हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांनी पाकिस्तानवर प्रतिआक्रमण करत सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला.
त्याचवेळी शोएब अख्तरने टाकलेल्या ४९ व्या षटकात सुरेश रैनाने शोएब अख्तरला एक सणसणीत षटकार ठोकत सामना भारताच्या दिशेने झुकवला. मात्र षटकातील अखेरच्या चेंडूवर हरभजन सिंगला धाव घेता आली नाही. त्यावेळी शोएब अख्तरने आक्रमक होत हरभजन सिंगला त्याच्या जवळ जाऊन डिवचले. त्यावर गरम माथ्याच्या हरभजननेही तितकेच तिखट प्रत्युत्तर दिले. अखेर पंच बिली डॉक्ट्रोव्ह यांना दोघांमध्ये मध्यस्थी करावी लागली.
अखेरीस सामन्यातील शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी २ चेंडूत ३ धावांची गरज होती. तर हरभजन सिंग स्ट्राईकवर होता. हरभजनने मोहम्मद आमीरने टाकलेल्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मिडविकेट बाहेर खणखणीत षटकार ठोकत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. त्यानंतर हरभजनने आक्रमक पद्धतीने विजयाचं सेलिब्रेशन केलं. त्याने एका हातात हॅल्मेट आणि दुसऱ्या हातात बॅट घेत मोठ्याने गर्जना केली आणि पाकिस्तानी खेळाडूंना डिवचले. यावेळी शोएब अख्तरचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.