Join us  

मोहम्मद सि'राज'! भारताच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंका ५० धावांत तंबूत, विक्रमी कामगिरी

आजचा दिवस मोहम्मद सिराजने गाजवला... त्याने २१ धावांत ६ विकेट्स घेतल्या आणि उर्वरित ३ विकेट्सही जलदगती गोलंदाजांच्या पारड्यात पडल्या. #AsiaCup2023

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 5:12 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारतासमोर तगडे लक्ष्य उभं करण्याच्या निश्चयाने प्रथम फलंदाजीचा निर्णय श्रीलंकेनं घेतला खरा, परंतु मोहम्मद सिराजच्या ( Mohammed Siraj) निर्दयी माऱ्यासमोर ते ढेपाळले. सिराजने एका षटकात ४, १६ चेंडूंत ५ विकेट्स घेतल्या. कर्णधार रोहित शर्मानेही त्याचा गोलंदाजीचा स्पेल कायम ठेवला अन् श्रीलंकच्या फलंदाजांनी तंबूत जाण्याची रांग लावली. 

जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिल्यानंतर सिराजने कंबरडे मोडले. त्याने चौथ्या षटकात  पथूम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजया डी सिल्वा हे फॉर्मात असलेल्या फलंदाजांना माघारी पाठवले.  वन डे क्रिकेटमध्ये एकाच षटकात ४ विकेट्स घेणारा सिराज हा पहिलाच भारतीय ठरला. त्यानंतर त्याने कर्णधार दासून शनाकाचा त्रिफळा उडवून श्रीलंकेची अवस्था ६ बाद १२ धावा अशी केविलवाणी केली. सिराजने १२व्या षटकात कुसल मेंडिसचा ( १७) त्रिफळा उडवला. २००२ नंतर वन डे क्रिकेटमध्ये भारतासाठी पहिल्या १० षटकांत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम सिराजने नावावर केला. २००३ मध्ये जवागल श्रीनाथने जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ विकेट्स घेतल्या होत्या. 

हार्दिक पांड्याने अप्रतिम बाऊन्सरवर दुनिथ वेल्लालागेला ( ८) माघारी पाठवले. सिराजने ६ विकेट्स घेत आणखी एक विक्रम नोंदवला. आशिया चषक ( वन डे ) स्पर्धेत ६ विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय अन् एकंदर दुसरा गोलंदाज ठरला. श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसने भारताविरुद्ध २००८ मध्ये कराची येथे १३ धावांत ६ विकेट्स घेतल्या होत्या. आज सिराजने ६ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. सिराजला विश्रांती देऊन भारताने हार्दिकला षटक दिले अन् त्याने प्रमोद मदुशानला ( १) विराटकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ मथीषा पथिराणाला बाद करून श्रीलंकेचा संपूर्ण संघ ५० धावांवर माघारी पाठवला. सिराजने ७-१-२१-६ अशी अप्रतिम स्पेल टाकली. हार्दिकने 3 व जसप्रीतने १ विकेट घेतली. 

टॅग्स :एशिया कप 2023मोहम्मद सिराजभारत विरुद्ध श्रीलंका