दुबई, आशिया चषक 2018 : दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या रवींद्र जडेजाने झोकात पुनरागमन केले. सुपर फोर गटातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने सामन्यावर मजबुत पकड घेतली. या कामगिरीसह त्याने तब्बल चार वर्षांनंतर एक पराक्रम केला.
भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी बांगलादेशच्या सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने चेंडू जडेजाकडे सोपवला. फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजांना नाचवले. जडेजाने शकीब अल हसन (17), मुश्फीकर रहमान ( 21) आणि मोहम्मद मिथून ( 9) यांना बाद केले. त्याने 10 षटकांत 29 धावांत 4 विकेट घेतल्या.
या कामगिरीसह त्याने तब्बल 4 वर्षांनंतर वन डे सामन्यात तीन विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 6 जुलै 2017मध्ये जडेजा अखेरचा वन डे सामना खेळला होता. शुक्रवारी त्याने वन डे संघात दमदार कमबॅक केले. त्याने 11 ऑक्टोबर 2014 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 44 धावांत 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतरची आजची त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.