अबूधाबी- पाकिस्तान क्रिकेट संघाला बांगलादेशच्या आव्हानाला आज सामोरे जावे लागणार आहे. पाकला अंतिम फेरीसाठी बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करावी लागेल.भारताविरुद्ध सुपर फोर सामन्यात 9 गड्यांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी संघाची वाटचाल खडतर असल्याचे म्हटले होते. सामन्याआधीच मिकी आर्थर यांनी भारतीय संघावर टीका केली आहे.
पाकिस्तान सुपर फोर सामन्यात बांगलादेशाला पराभवाची धूळ चारेल आणि अंतिम फेरीत भारताचा बदला घेईल, असंही पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर म्हणाले आहेत. ते म्हणाले, भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सुपर फोर सामन्यात काही बळी लवकर मिळाले असते, तर परिस्थिती बदलली असती. भारतानं पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केल्याचं आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आता पुढच्या सामन्यांत पाकिस्तान चांगलं प्रदर्शन करेल.
मिकी आर्थर यांची 2016मध्ये पाकिस्तानच्या संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वातच पाकिस्तान संघानं इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2017मध्ये भारताचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली होती.