- अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवले आणि दोन्ही सामने एकतर्फी रंगले. पाकिस्तानचा संघ खेळाच्या तिन्ही विभागांत कमजोर दिसला. दुसºया सामन्यात भारतीय फलंदाजांची परीक्षाच पाहिली गेली नाही. दुसºया सामन्यात पाक कर्णधार सरफराझ अहमद याने प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. खेळपट्टी पाहता मिळालेले लक्ष्य गाठणे काहीसे सोपे पडले असते. भलेही भारताने तीनशेचा डोंगर उभारला असता, पण एक नियोजन पाक संघाला करता आले असते. ती संधी त्यांनी गमावली.
नक्कीच यूएईचे मैदान पाकिस्तानसाठी घरच्या मैदानाप्रमाणे आहे. पण तरीही त्यांच्याकडून चुका झाल्या. त्यांची फलंदाजी खूप कमजोर आहे. शोएब मलिकचा अपवाद वगळला, तर हा संघ अपयशी ठरेल. काही प्रमाणात बाबर आझम चांगला फलंदाज आहे. पण तोही घाबरल्यासारखा वाटला. फखर जमाने बाद झाल्यानंतर डीआरएसही घेतला नाही. तो आणि इमाम उल हक एकाच वेळी अपयशी ठरले तर संपूर्ण संघ कोलमडून जातो आणि तेच भारताविरुद्ध पाहण्यास मिळाले. गोलंदाजीमध्येही पाकिस्तान अपयशी ठरले. मोहम्मद आमिरने खूप मोठी निराशा केली. ज्या प्रकारे त्याच्या भेदकतेचे चित्र रंगविण्यात आले होते, त्याप्रमाणे त्याला कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हाही पाकिस्तानला बसलेला मोठा धक्का आहे. पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील यशाला गृहीत धरून भारताविरुद्ध खेळला. पण भारताने अखेर आपला हिसका दाखवला. तरी अंतिम फेरीत पाकिस्तान आला, तर काहीही होऊ शकते. शेवटी हे एकदिवसीय क्रिकेट आहे. पण आतापर्यंत भारताने वर्चस्व राखल्याचे नाकारता येणार नाही.
आता अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताकडे प्रयोग करण्याची संधी असेल.
अंतिम फेरी निश्चित झालेली असल्याने हा सामना औपचारिकतेचा असेल. माझ्या मते प्रयोग होणार असतील, तर लोकेश राहुल - मनिष पांडे यांना संधी मिळायला पाहिजे. अफगाणिस्तान या स्पर्धेतील दुर्दैवी संघ ठरला आहे. कारण त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध अखेरच्या षटकात सामना गमावला आहे. त्यांच्याकडे अनुभव असता, तर नक्कीच ते हे दोन्ही सामने जिंकले असते. तरी त्यांची गोलंदाजी भारताविरुद्ध कशी होते याची मला उत्सुकता लागली आहे. अफगाण संघामध्ये अनुभवाची कमतरता असून त्यांची फलंदाजीही कमजोर आहे. गोलंदाजी चांगली असल्याने ते टक्कर देत आहेत. पण त्याचवेळी जर का या संघाने आपली फलंदाजी सुधारली, तर अफगाण संघ नक्कीच प्रभावी कामगिरी करेल.
बांगलादेश संघात सातत्याचा अभाव दिसून येतो. त्यांची आतापर्यंतची वाटचाल अडखळत झाली आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना पाकिस्तानचे कडवे आव्हान असेल. तरी, अफगाण संघाने या स्पर्धेत खूप प्रभावित केले. त्यांच्यामध्ये अनुभवाची नक्कीच कमतरता आहे. पण या संघात गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे. भारताने स्पर्धेवर आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखले.