दुबई, आशिया चषक 2018 : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या नेतृत्व कौशल्यामुळे जगभरात ओळखला जातो. सध्या त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी नसली तरी तो अजुनही युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतो. भारतीय संघ अडचणीत असताना त्याने नेहमीच आपल्या अनुभवाच्या जोरावर संघाला तारले आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात याची प्रचिती आली. संघासाठी धोकादायक ठरत असलेल्या शकीब अल हसनलाही धोनीने चतुराईने बाद केले. त्याशिवाय फलंदाजी करतानाही त्याने रोहित शर्माला सल्ला दिला.
बांगलादेशचा गोलंदाज मश्रफे मुर्तजाच्या गोलंदाजीवर चौकार मारण्याचा धोनीने प्रयत्न केला, परंतु त्याला अचुक फटका मारता आला नाही आणि तो मोहम्मद मिथुनकरवी झेलबाद होत माघारी परतला. चेंडू हवेत असताना धोनीने नॉन स्ट्रायकर रोहितला हाताने क्रिज बदलण्याचा इशारा केला. बाद होतानाही धोनीने रोहितला दिलेल्या या सल्ल्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
रोहितने क्रिज बदलली नसती तर नवीन येणाऱ्या खेळाडूला चेंडूचा सामना करावा लागला असता. त्याचे फलंदाजावर दडपण आले असते, त्यामुळे धोनीने तो सल्ला दिला.