दुबई, आशिया चषक 2018 : भारताने आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील सामन्यात बांगलादेशच्या तीन फलंदाजांना पहिल्या दहा षटकांत माघारी धाडले. बांगलादेशचे दोन्ही सलामीवर 16 धावांवर तंबूत परतले असताना अनुभवी खेळाडू शकीब अल हसन भारतासाठी डोकेदुखी ठरत होता. त्याने फटकेबाजी करताना बांगलादेशला मजबूत स्थितीत आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या मनसुब्यांबवर पाणी फिरवले.
शकीब फलंदाजीला आला त्यावेळी बांगलादेशची अवस्था 1 बाद 15 अशी होती. त्यात एक धावांची भर घालून बांगलादेशचा आणखी एक फलंदाज माघारी परतला. अशा परिस्थितीत शकीबने सामन्याची सुत्र हातात घेतली. त्याच्या नियंत्रित खेळाने भारताचा कर्णधार रोहित शर्माला तणावात टाकले. त्यामुळेच पंचांच्या एका निर्णयावर रोहितने हुज्जत घातली.
रवींद्र जडेजाच्या चेंडूवर शकीब आक्रमण करत होता. रोहितलाही काय करावे सुचत नव्हते अशा परिस्थितीत धोनीने रोहिलला एक सल्ला दिला आणि त्याचा फायदा संघाला झाला. धोनीने टाकलेल्या सापळ्यात शकीब अडकला आणि भारताला तिसरे यश मिळाले. धोनीने क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार रोहितने स्क्वेअर लेगला शिखर धवनला उभे केले. शकीब स्वीप मारण्याच्या नादात त्याच्या हातात झेल देऊन माघारी परतला.