दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक स्पर्धेत बागंलादेशच्या सलामीच्या फलंदाजांचा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आत्तापर्यंत झालेल्या चारही सामन्यात त्यांचा निम्मा संघ सरासरी 75 धावांवरच माघारी परतला आहे. त्यामुळे अंतिम लढतीत त्यांनी बॅटींग ऑर्डरमध्येच बदल करताना भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान उभे केले आहे.
आशिया चषक स्पर्धेतील चार सामन्यात
बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांना अफगाणिस्तान ( 5/79),
भारत ( 5/65), अफगाणिस्तान ( 5/87) आणि पाकिस्तान ( 3/12) या संघांविरुद्ध अपयश आले होते. ही कमकुवत बाब लक्षात घेता
बांगलादेशने अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळाडू मेहदी हसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला. मेहदी प्रथमच सलामीला आला आहे.
तो 7 व्या किंवा 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी, फिरकी गोलंदाजांना अप्रतिम स्वीप मारण्याची शैली आणि जलद माऱ्याचा संयमाने सामना करण्याच्या शैलीमुळे त्याल सलामीला पाठवण्यात आले आहे. साखळी गटात त्याने भारताविरुद्ध 42 धावांची खेळीही केली होती.