दुबई, आशिया चषक 2018 : तीन सामन्यांत दोन पराभवानंतर बांगलादेश संघाने बचावासाठी नवे भिडू मागावले आहेत. आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटातील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला गतविजेत्या भारताकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांनी संघात दोन बदल केले आहेत. त्यांनी सौम्या सरकार आणि इम्रूल कायेस यांना पाचारण केले आहे.
आशिया चषक स्पर्धेत श्रीलंकेवर विजय मिळवणाऱ्या बांगलादेशला पुढील दोन्ही सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यांना अफगाणिस्तानने 136 धावांनी पराभूत केले, तर शुक्रवारी भारताने त्यांच्यावर सात विकेट राखून विजय मिळवला. बांगलादेशच्या तमिम इक्बालला पहिल्याच सामन्यात दुखापत झाली, शकीब अल हसन आणि रहिम हेही पूर्णपणे तंदुरूस्त नाहीत. त्यामुळे सरकार व कायेस यांना संघात स्थान देण्यात आले आहे. हे दोघेही ऑक्टोबर 2017 नंतर संघात पुनरागमन करत आहेत.
![]()
![]()