दुबई, आशिया चषक : इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या भारताचा सलामीवीर शिखर धवननेआशिया चषक स्पर्धेत सकारात्मक सुरूवात केली. दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. पण, या अर्धशतकासाठी त्याला सहा महिन्यांचा कालावधी लागला. त्याने 10 फेब्रुवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 109 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने प्रथमच पन्नास धावांचा टप्पा ओलांडला.
अपयशी कामगिरीमुळे
शिखर धवनवर चहुबाजून टीका होत होती. इंग्लंडमध्ये खेळलेल्या तीन वन डे सामन्यात त्याला केवळ 120 धावा करता आल्या. 44 धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम होती. कसोटी मालिकेत तर धवनने अपयशाचा कित्ता वारंवार गिरवला. तरीही त्याला आशिया चषक स्पर्धेतील संघात स्थान दिल्याने क्रिकेटप्रेमी भडकले होते. मात्र त्याने पहिल्याच सामन्यात अर्धशतक पूर्ण करून चाहत्यांच्या रोषाची धार किंचितशी बोथट केली आहे.