लंडन - राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला मांकडिंग पद्धतीने बाद केले होते. या प्रकारानंतर अश्विनवर जोरदार टीका होऊ लागली होती. दरम्यान, क्रिकेटच्या नियमांचे संरक्षक मानल्या जाणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लब अर्थात एमसीसीनेही या प्रकाराची समीक्षा केल्यानंतर अश्विनने केलेले कृत्य खिलाडूवृत्तीच्या विरोधात असल्याचे मत मांडले आहे.
पंजाब आणि राजस्थानच्या संघांमध्ये सोमवारी जयपूर येथे झालेल्या लढतीत अश्विनने राजस्थानचा स्फोटक फलंदाज जोस बटलरला मांकडिंग पद्धतीने धावबाद केले होते. त्यानंतर अश्विनवर टीका होत होती. पण एमसीसीने सुरुवातीला अश्विनचे समर्थन केले होते. आता मात्र एमसीसीने याबाबत आपली भूमिका बदलली आहे.
ब्रिटिश वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार एमसीसीचे विधी व्यवस्थापक फ्रेझर स्टीवर्ट यांनी सांगितले की, अश्विनने केलेल्या मांकडिंगची समीक्षा केल्यानंतर हा प्रकार खिलाडूवृत्तीला धरून होता, असे आम्हाला वाटत नाही. अश्विनने क्रीझमध्ये पोहोचून थांबेपर्यंत बराच वेळ घेतला, अशा परिस्थिती चेंडू टाकण्यात आला आहे, असे फलंदाजाला वाटू शकते. बटलरलाही तसेच वाटले असावे.''
दरम्यान, मंगळवारी मात्र एमसीसीने या कृतीला विरोध दर्शवला नव्हता. नॉन स्ट्राइकला उभ्या असलेल्या फलंदाजाला मांकडिंग करण्यापूर्वी इशारा देण्यात यावा, असे क्रिकेट्या कुठल्याही नियमात नोंद केलेले नाही.'' असे एमसीसीन त्यावेळी म्हटले होते.