Virat Kohli Emotional on R Ashwin retirement: भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर आणि मॅचविनर आर अश्विन याने आज अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना ब्रिसबेन गाबा मैदानात खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर रोहित शर्मासोबत प्रेस कॉन्फरन्ससाठी अश्विनदेखील उपस्थित राहिला. त्याचेवेळी त्याने आपल्या निवृत्तीचा घोषणा केली. मालिकेतील दोन सामने शिल्लक असताना अचानक निवृत्ती घेण्यामागचे कारण काय, असा सवाल अनेकांना पडला आहे. पण अश्विनने आपल्या निवृत्तीची कल्पना विराट कोहलीला आधीच दिली असल्याचे दिसून आले. तसेच विराटदेखील त्यावेळी भावनिक झाल्याचे दिसले. तेव्हाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याबद्दल विराटनेही ट्विट केले आहे.
व्हिडीओमध्ये काय घडले?
सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे रोहित शर्मा आणि सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये बसले होते. विराट ड्रेसिंग रुममध्ये असताना अश्विन त्याच्या जवळ आला आणि त्याच्याशी काहीतरी बोलला. अश्विनचे बोलणे संपताच विराट नि:शब्द झाला. त्याने अश्विनला घट्ट मिठी मारली. मग ते दोघेही काही सेकंदांसाठी नि:शब्द झाले. आणि त्यानंतर पुन्हा गप्पा मारू लागले.
पाहा, अश्विन विराटचा भावनिक व्हिडीओ-
विराटला कोहलीचा भावनिक संदेश
दरम्यान, अश्विनने विराटच्या भेटीनंतर आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करून दिली. "मी तुझ्यासोबत १४ वर्ष क्रिकेट खेळलो. आज तू मला येऊ सांगितलंस की मी निवृत्त होतोय, त्यामुळे मी काहीसा भावनिक झालो. आपण एकत्रितपणे खेळलेल्या क्रिकेट सामन्यांच्या आठवणी पटापट माझ्या डोळ्यासमोरून गेल्या. अँश, तुझ्याबरोबर खेळलेल्या क्रिकेटमधील प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला. तुझी प्रतिभासंपन्न बुद्धिमत्ता, भारतासाठी सामने जिंकवून देण्याची क्षमता यामुळे तू कायम भारतीय क्रिकेटचा दिग्गज म्हणून लक्षात राहशील. तुझे पुढील आयुष्य तुझ्या कुटुंबासोबत खूप छान आणि भरभराटीचे जावो. तुझ्याबद्दल मनात कायम आदर राहिल. तुझ्या योगदानासाठी खूप खूप आभार," अशा शब्दांत विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, भारतीय संघासाठी अश्विनने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या. तसेच, कसोटी क्रिकेटच्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी असताना अश्विनने क्रिकेटला रामराम ठोकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला अश्विन क्लब क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी IPL 2025 मध्ये अश्विनने धोनीसोबत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे.