Join us

डब्ल्यूटीसी फायनलसाठी अश्विन, जडेजा संघात हवेत : रवी शास्त्री

दुबई : ‘भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील महिन्यात ओव्हल येथे जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत खेळायची आहे. या लढतीसाठी ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 05:56 IST

Open in App

दुबई : ‘भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील महिन्यात ओव्हल येथे जागतिक कसोटी अजिंक्यपदाची (डब्ल्यूटीसी) अंतिम लढत खेळायची आहे. या लढतीसाठी भारत बलाढ्य संघ मैदानावर उतरवेल. मात्र, अंतिम संघात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना स्थान देणे आवश्यक आहे,’ असे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.  

शास्त्री प्रशिक्षक असताना भारतीय संघाने २०२१ मध्ये ओव्हल येथे कसोटी सामना जिंकला होता. मात्र, त्यावेळी संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांच्याशिवाय तत्कालीन उपकर्णधार रोहित शर्माने शतक झळकावून मोलाची भूमिका बजावली होती. शास्त्री यांनी डब्ल्यूटीसी फायनलसाठी स्वत:चा संघ निवडताना सांगितले की, ‘बुमराहच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका बसला आहे. अशावेळी संघाने एका अन्य फिरकीपटूसह मैदानावर उतरायला हवे. भारताने गतवर्षी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली होती. कारण संघात बुमराह, शमी, शार्दुल ठाकूर आणि सिराज होते. अशाप्रकारे भारतीय संघात चार वेगवान गोलंदाज आणि शार्दुल अष्टपैलू खेळाडू होता.’    

त्याचप्रमाणे, ‘परिस्थिती आणि खेळाडूंचा फाॅर्म पाहून त्यांनी निवड करणे गरजेचे आहे, असे शास्त्री म्हणाले. जर तुमच्या संघाची वेगवान गोलंदाजी फळी चांगली नाही, काही गोलंदाजांचे वय वाढले असून ते वेगवान मारा करू शकत नाहीत, असे वाटत असेल तर दोन फिरकीपटूंसह उतरणे फायद्याचे ठरेल. अश्विन आणि जडेजा हे दोघेही उत्तम फिरकीपटू आहेत,’ असेही शास्त्री म्हणाले. 

दोन फिरकीपटू फायदेशीर!भारताने संघात अश्विन, जडेजा यांच्याशिवाय अक्षर पटेल हा तिसरा फिरकीपटूही ठेवला आहे. शास्त्री म्हणाले की, ‘खेळपट्टी कोरडी आणि टणक असेल तर भारतीय संघाने कोणत्याही परिस्थितीत दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरले पाहिजे. इंग्लंडमध्ये वातावरणाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, आता तेथे ऊन आहे; पण तेथील वातावरण कधीही बदलू शकते. त्यामुळे भारताने दोन फिरकीपटू, दोन वेगवान गोलंदाज आणि एका अष्टपैलू खेळाडूसह मैदानावर उतरावे.’

रवी शास्त्री यांनी निवडलेला भारतीय संघ  : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, के. एस. भरत (यष्टिरक्षक), शार्दुल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

टॅग्स :रवी शास्त्री
Open in App