Join us  

यशस्वी पुनरागमनांची 'अ‍ॅशेस' कसोटी; स्मिथ, वेड व पॅटीन्सन तिघेही ठरलेत सफल!

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली अ‍ॅशेस कसोटी स्टीव्ह स्मिथ व रोरी बर्नस् गाजवत असला तरी आणखी एका कारणासाठी ही कसोटी वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. ते कारण म्हणजे एक-दोन नव्हे तर तीन-तीन खेळाडूंच्या दीर्घकाळानंतर यशस्वी पुनरागमनाने हा सामना वैशिष्ट्यपूर्ण ठरवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 12:31 PM

Open in App

- ललित झांबरेइंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली अ‍ॅशेस कसोटी स्टीव्ह स्मिथ व रोरी बर्नस् गाजवत असला तरी आणखी एका कारणासाठी ही कसोटी वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. ते कारण म्हणजे एक-दोन नव्हे तर तीन-तीन खेळाडूंच्या दीर्घकाळानंतर यशस्वी पुनरागमनाने हा सामना वैशिष्ट्यपूर्ण ठरवला आहे. योगायोगाने हे तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियन आहेत. यात सामन्याच्या दोन्ही डावातील शतकवीर स्मिथ, यष्टीरक्षक-फलंदाज मॅथ्यू वेड आणि गोलंदाज जेम्स पॅटीन्सन यांचा समावेश आहे. 

स्मिथचा मार्च 2018 नंतरचा हा पहिलाच कसोटी सामना. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या केपटाऊन कसोटीत सँडपेपर प्रकरण घडल्यापासून बंदीची शिक्षा आणि दुखापतींमुळे तो ऑस्ट्रेलियन संघाबाहेरच होता. या दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियाने 9 कसोटी सामने खेळले ज्यात स्मिथ नव्हता मात्र त्यानंतर संघात धडाकेबाज पुनरागमन करताना त्याने 144 व 142 धावांच्या शतकी खेळी केल्या आहेत. 

मॅथ्यू वेडने 2012 मध्ये विंडीज व श्रीलंकेविरुध्द शतकी खेळी करुन दमदार आगमन केले होते. मात्र 2013 च्या भारत  दौऱ्यात प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी दिलेला होमवर्क न केल्याने निलंबनाची शिक्षा केल्याचा अप्रत्यक्ष फटका वेडलाही बसला आणि तो संघाबाहेर गेला. तेंव्हापासून त्याचे स्थान अनिश्चित राहिले. गेल्या मोसमात टास्मानियासाठी भरपूर धावा केल्यावर तो पुन्हा संघात परतलाय. 

वेडने आपला याआधीचा शेवटचा कसोटी सामना सप्टेंबर 2017 मध्ये बांगलादेशविरुध्द खेळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 17 कसोटी सामने खेळले पण वेड संघाबाहेरच होता मात्र आता मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. दुसऱ्या डावातील 110 धावांची त्याची शतकी खेळी आता संघात त्याचे स्थान निश्चित करेल अशी आशा आहे. 

पॅटीन्सनने याआधीच्या 17 कसोटी सामन्यांत 70 बळी मिळवले आहेत. पण पाठदुखी आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो संघात आतबाहेर होत राहिला आहे. स्ट्रेसॅक्चरच्या त्रासाने त्याला भयंकर छळले आहे.त्यामुळेच पाच वर्षात तो फक्त 17 सामने खेळला आणि त्यानंतर तीन वर्षांनी आता 18 वा सामना खेळतोय.  गेल्या मोसमात व्हिक्टोरियासाठी त्याने चमकदार कामगिरी केली आणि  फेब्रुवारी 2016 नंतर तो पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात परतलाय.  या काळातले 32 कसोटी सामने तो मुकला पण आता पुनरागमनावेळी पहिल्या डावात दोन बळी आणि फलंदाजीत नाबाद 47 धावा ही आपली सर्वोच्च खेळी करुन त्याचेही पुनरागमन सफल ठरले आहे.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019स्टीव्हन स्मिथआॅस्ट्रेलियाइंग्लंड