अॅडलेड : जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क आणि जोश हेजलवूड यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर आस्ट्रेलियाने इंग्लंडचा १२० धावांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी प्रतिष्ठेच्या अॅशेस पाच कसोटी मालिकेत २-० ने आघाडी घेतली.
पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी हेजलवूडने तिसºया षटकांत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याला बाद केले आणि त्यांच्या आशेला धक्का दिला. स्टार्कने तळातील फलंदाजांचा सफाया केला. त्याने ८८ धावा देत ५ बळी घेतले. आता इंग्लंडचा संघ पुढील आठवड्यात तिसºया कसोटी सामन्यासाठी पर्थच्या वाका मैदानावर उतरणार आहे. इंग्लंडवर मालिका गमावण्याचे संकट आहे. कारण १९७८ नंतर या मैदानावर इंग्लंडने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही.
या सामन्यात रुट हा खेळपट्टीवर होता. इंग्लंडपुढे ३४५ धावांचे आव्हान होते. त्यांच्या आशा कायम होत्या. पण हेजलवूडने तळातील फलंदाजांना फस्त केले. रुट हा ६७ धावांवर तंबूत परतला. क्रिस वोक्स हा दुसºयाच चेंडूवर बाद झाला. त्याने रिव्हू मागितला होता; पण ‘हॉट स्पॉट’ इन्फ्रारेड इमेजिंग प्रणालीत काही मिळाले नाही. अखेर पंचांचा निर्णय कायम राहिला. नाथन लियाने याला मालिकेत चौथ्यांदा मोईन अलीचा बळी मिळाला. तो पायचित झाला.
इंग्लंडची ७ बाद १८८ अशी अवस्था झाली होती. स्टार्कने स्टुअर्ट ब्रॉडला (८) बाद केले. जानी बेयरस्टो हा ३६ धावांवर बाद झाला. तो अंतिम फलंदाज ठरला. इंग्लंडला शेवटच्या दिवशी विजयासाठी १७८ धावांची गरज होती आणि त्यांचे सहा फलंदाज शिल्लक होते.