ब्रिस्बेन : अॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियानेइंग्लंडचा १० गड्यांनी पराभव केला. याबरोबरच त्यांनी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. सलामीवर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बेनक्राफ्ट यांनी पाचव्या तसेच शेवटच्या दिवशी शानदार भागीदारी केली.
वॉर्नरने ११९ चेंडूंत ८७ तर बेनक्राफ्टने १८२ चेंडूंत ८२ धावा केल्या. आॅस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता १७३ धावा केल्या. सकाळच्या सत्रात त्यांना विजयासाठी ५६ धावांची गरज होती. हे आव्हान त्यांनी सहज गाठले. आव्हानाचा सलग पाठलाग करताना त्यांनी सर्वाेच्च सलामी भागीदारीचा ८७ वर्षांचा विक्रमही मोडला. वॉर्नरचे हे २५ वे कसोटी अर्धशतक आणि अॅशेजमधील ९ वे अर्धशतक होते. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाºया बेनक्राफ्टचे आपल्या दुसºया डावातील पहिले अर्धशतक होते. दुसरीकडे, इंग्लंडने ३१ वर्षांपासून ब्रिस्बेन येथे एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. आता दुसरा सामना अॅडिलेड येथे शनिवारपासून सुरू होईल.
फिलिप ह्युजेसला श्रद्धांजली
आॅस्ट्रेलियाचा दिवंगत फलंदाज फिलिप ह्युजेस याचे ३ वर्षांपूर्वी याच दिवशी मैदानावर चेंडू लागून निधन झाले होते. त्याला आॅस्ट्रेलियन संघाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
धावफलक :
इंग्लंड पहिला डाव ३०२ धावा. आॅस्ट्रेलिया पहिला डाव ३२८ धावा. इंग्लंड दुसरा डाव १९५ धावा. आॅस्ट्रेलिया दुसरा डाव ५० षटकांत १७३ धावा. फलंदाजी- वॉर्नर नाबाद ८७, बेनक्राफ्ट नाबाद ८२. गोलंदाजी : अॅँडरसन ११-२-२७-०, अली ४-०-२३-०, वोक्स ११-१-४६-०, बॉल ८-१-३८-०, रुट ६-१-१७-०.