अॅडलेड : मधल्या फळीतील फलंदाज शॉन मार्श याने प्रतिकिूल परिस्थितीत केलेल्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने मजबूत धावसंख्या उभारली व त्यानंतर इंग्लंडला सुरुवातीलाच धक्के देत दुसºया अॅशेस कसोटी सामन्यातील दुसरा दिवस गाजवला.
मार्शने नाबाद १२६ धावा केल्या. हे त्याचे कारकिर्दीतील पाचवे शतक ठरले. त्याने यष्टिरक्षक फलंदाज टीम पेन (५७) याच्या साथीने सहाव्या गड्यासाठी ८५ आणि नवव्या स्थानावरील फलंदाज पॅट कमिन्स (४४) याच्या साथीने आठव्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने या दिवस-रात्र कसोटीत आपला पहिला डाव ८ बाद ४४२ धावांवर घोषित केला.
प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि पावसामुळे दुसºया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा त्यांनी १ बाद २९ धावा केल्या होत्या. मिशेल स्टार्कने मार्क स्टोनमन (१८) याला पायचित करीत आॅस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. स्टोनमन याने रेफरलदेखील घेतले; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. दिवसअखेर अॅलिस्टर कुक ११ धावांवर खेळत होता, तर जेम्स विन्सने अद्याप भोपळा फोडला नाही. इंग्लंड अद्यापही ४१३ धावांनी पिछाडीवर आहे.
तत्पूर्वी, मार्शची धीरोदात्त शतकी खेळी हे आॅस्ट्रेलिया डावाचे वैशिष्ट्य ठरले. त्याने ३२८ मिनिटांत २१३ चेंडूंचा सामना करताना शतक पूर्ण केले. त्याने त्याच्या नाबाद खेळीत १५ चौकार व एक षटकार मारला. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉडने २, तर क्रेग ओवर्टन याने ३ गडी बाद केले.
आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : १४९ षटकांत ८ बाद ४४२ (घोषित). (शॉन मार्श नाबाद १२६, टीम पेन ५७, कमिन्स ४४, उस्मान ख्वाजा ५३, डेव्हिड वॉर्नर ४७. ओवर्टन ३/१0५, ब्रॉड २/७२, अँडरसन १/७४, वोक्स १/८४).
इंग्लंड (पहिला डाव) : ९.१ षटकांत १ बाद २९. (अॅलिस्टर कुक खेळत आहे ११, मार्क स्टोनमन १८, विन्स खेळत आहे ०. स्टार्क १/१३).