Ashes ENG vs AUS 1st Test : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रोमांचक वळणावर आली आहे. इंग्लंडचा दुसरा डाव चौथ्या दिवशी २७३ धावांवर गुंडाळला आणि ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २८१ धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी पाचव्या दिवशी १७४ धावा करायच्या आहेत आणि इंग्लंडला ७ विकेट्सची गरज आहे. कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या चाहत्यांनी लाईव्ह सामन्यात स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) चिडवले, पण त्यांच्या कर्माचं फळ भोगावी लागली आहेत. इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयाची आस आहे, परंतु पावसाने तुफान बॅटींग सुरू केली आहे.
वॉर्नर ( ३६), मार्नस लबुशेन (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (६) काही विशेष करू शकले नाहीत. त्यामुळे आता पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला १७४ धावा करायच्या आहेत, तर त्याचवेळी इंग्लंडला विजयासाठी आणखी सात विकेट्स घ्याव्या लागतील. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात स्टुअर्ट ब्रॉडने सर्वाधिक दोन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ख्वाजाने ३४ धावा केल्या तर नाईटवॉचमन स्कॉट बोलँड १३ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर ३ बाद १०७ धावा केल्या आहेत.
इंग्लंडच्या बार्मी आर्मीने स्टीव्ह स्मिथ क्षेत्ररक्षण करत असताना त्याला डिवचले... तुझ्या डोळ्यात आम्हाला पराभवाचे अश्रू दिसू लागले आहेत, असे गाणं ते गात होते. पण, आज पावसाने फटकेबाजी केल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांवर रडण्याची वेळ आली तर आश्चर्य वाटायला नको.
इंग्लंडने चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दमदार सुरुवात केली आणि सलामीला ६१ धावांची भर घातली. रॉबिन्सनने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले आणि वॉर्नरला ३६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडने दोन धक्के देताना ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर फेकले आहे.