आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात अनसोल्ड टॅग लागल्यावर अखेरच्या टप्प्यात शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. आता KKR चा संघ त्याच्यावर कॅप्टन्सीचा डाव लावणार असल्याचे वृत्त आहे. अजिंक्य रहाणे हा टीम इंडियाबाहेर असला तरी रणजी करंडक स्पर्धेत मुंबई संघाकडून खेलताना त्याने आपल्या नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून दिले आहे.
हीच गोष्ट आयपीएलमध्ये त्याच्या फायद्याची ठरणार असल्याचे दिसते. जर KKR नं कॅप्टन्सीची माळ त्याच्या गळ्यात घातली तर 'बाजीगर' चित्रपटातील "हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं!" हा डायलॉग अजिंक्यसाठी एकदम परफेक्ट ठरेल. कारण अनसोल्ड राहिल्यावर अखेरच्या टप्प्यात KKR लावलेली बोली अन् त्यानंतर कॅप्टन्सीची जबाबदारी असा प्रवास तो करेल.
कॅप्टन्सीसाठीच खेळला होता तो डाव
टाइम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात पार पडलेल्या मेगा लिलावात केकेआरच्या संघानं ३६ वर्षीय खेळाडूला १ कोटी ५० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तो कॅप्टन्सीचा एक उत्तम पर्याय असल्यामुळेच त्याला संघात घेण्यात आले आहे. लवकरच कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून कॅप्टन्सीसंदर्भात मोठी घोषणा होऊ शकते.
नो अय्यर; नो रिंकू! KKR ची कॅप्टन्सीसाठी अजिंक्य रहाणेला पसंती
गत हंगामात मुंबईकर श्रेयस अय्यर कोलकाता संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. त्याच्या कॅप्टन्सीत संघानं जेतेपदही पटकावलं. पण त्याला मेगा लिलावाआधी संघानं रिलीज केले. कोलकाता संघाने मेगा लिलावात व्यंकटेश अय्यरवर २३ कोटी ७५ लाखांचा डाव खेळून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. किंमत मोठी असली तरी कोलकाताचा संघ कॅप्टन्सीची माळ त्याच्या गळ्यात घालण्याची हिंम्मत दाखवणार नाही, असे दिसते. व्यंकटेश अय्यरशिवाय कॅप्टन्सीच्या शर्यतीत रिंकू सिंगच्या नावाचाही समावेश होता. हे पर्याय बाजूला ठेवून शाहरुखचा संघ पुन्हा एकदा मुंबईकरावर विश्वास टाकणार असल्याचे दिसते.
IPL मध्ये KKR च्या संघा अजिंक्य रहाणे घेणार श्रेयसची जागा
अजिंक्य रहाणे हा मागील दोन हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता. याआधी तो केकेआरकडूनही खेळला आहे. यावेळी तो कॅप्टन्सीचा चेहरा म्हणून समोर येत आहे. विशेष म्हणजे देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईची कॅप्टन्सी त्याच्याकडून श्रेयस अय्यरकडे गेली असताना आता आयपीएलमध्ये तो अय्यरच्या जागी कॅप्टन्सी करताना दिसेल, असे चित्र निर्माण झाले आहे.