Aryavir Sehwag Virender Sehwag Son Batting: टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग हा गोलंदाजांसाठी कर्दनकाळ मानला जात असे. सेहवाग पहिल्याच षटकापासून गोलंदाजांची धुलाई करायचा. गोलंदाज त्याला गोलंदाजी करायलाही घाबरत असत. सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या आणि तडाखेबाज फलंदाज अशी वेगळी ओळख निर्माण केली. त्याचा मुलगा आर्यवीर सेहवाग देखील वडिलांप्रमाणेच गोलंदाजांसाठी डोकेदुखी बनला आहे. कूच बिहार ट्रॉफीमध्ये त्याने गोलंदाजांना अक्षरश: सळो की पळो करून सोडले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आर्यवीरची १४ चौकारांची आतषबाजी
कूचबिहार ट्रॉफीमध्ये आर्यवीर सेहवागने अद्भुत कामगिरी केली. २०२५चा कूचबिहार ट्रॉफी सामना दिल्ली आणि बिहार यांच्यात पालम येथील एअर फोर्स कॉम्प्लेक्स ग्राउंडवर खेळवण्यात आला. या सामन्यात आर्यवीर सेहवागने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले. दिल्लीचा कर्णधार प्रणव पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने पहिल्या डावात २७८ धावा केल्या. डावाची सुरुवात करताना आर्यवीर सेहवागने ७२ धावांची शानदार खेळी केली. या डावात त्याने १४ चौकार मारले. पहिल्या डावात आर्यवीरने कर्णधार पंतसोबत १४७ धावांची शानदार भागीदारी केली.
![]()
दुसऱ्या डावात नाबाद विजयी खेळी
२७८ धावा केल्यानंतर दिल्लीने बिहारला १२५ धावांवर बाद केले. त्यानंतर दिल्लीने बिहारला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात बिहार २०५ धावांवर ऑलआउट झाला. दिल्लीसमोर ५३ धावांचे सोपे लक्ष्य होते. दिल्लीने ८ गडी राखून हे आव्हान सहज पूर्ण केले. आर्यवीर सेहवाग दुसऱ्या डावात नाबाद राहिला. त्याने ४ चौकारांसह नाबाद २७ धावा कुटल्या. सेहवागने दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण ९९ धावा केल्या. त्याच्या दमदार खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.