सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेसाठी चेन्नईत पोहोचलेल्या खेळाडूंच्या राहण्याची सोय केलेल्या हॉटेलचे २० कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. चेन्नईतील हे हॉटेल कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे BCCI व तामिळनाडू क्रिकेट संघटनेची डोकेदुखी वाढली आहे. पण, तामिळनाडू क्रिकेट संघटनेनं खेळाडू सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
चेन्नईच्या लिला पॅलेस हॉटेलमध्ये प्लेट गटातील मेघालय, मणिपूर आणि मिझोराम या तीन संघांचे खेळाडू थांबले आहेत. १० जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ''चिंता करण्याची काहीच गरज नाही. लिला पॅलेस हॉटेलमध्ये थांबलेले खेळाडू आणि अन्य सदस्य सुरक्षित आहेत. त्यांना बायो-बबल सुरक्षिततेत ठेवण्यात आले आहे. हॉटेलमधील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त खरे आहे, परंतु ते सर्व बायो-बबल बाहेर होते. सर्व खेळाडू सुरक्षित आहेत,''असे तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यानं सांगितले.
याव्यतिरिक्त बंगळुरूत पोहोचलेल्या जम्मू-काश्मिर संघातील दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रिपोर्टनंतर दोन खेळाडूंसह संपूर्ण संघाला वेगवेगळ्या रुममध्ये ठेवण्यात आले आहे. मंगळवारी या खेळाडूंची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येईल. BCCI तामिळनाडू क्रिकेट संघटनेशी संपर्कात आहे. चेन्नईतील संपूर्ण हॉटेल सॅनिटाईझ करण्यात आले आहे.