Arjun Tendulkar Wickets, Goa vs Odisha, Vijay Hazare Trophy : आजपासून सुरु झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाने विजयी सलामी दिली. गोव्याने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ओडिशाचा पराभव केला. जयपूरच्या डॉ. सोनी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने अप्रतिम कामगिरी केली. अर्जुन तेंडुलकरने गोव्याच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान अर्जुन तेंडुलकरला टूर्नामेंटच्या मध्येच संघातून वगळण्यात आले होते. पण आता त्याने विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात दमदार कमबॅक केला.
गोव्याची ५० षटकांत ३७१ धावांची मजल
सामन्यात गोव्याने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. यावेळी गोव्याच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी करत ५० षटकांत ४ गडी गमावून ३७१ धावा केल्या. या काळात इशान गाडेकरने सर्वाधिक ९३ धावांची खेळी खेळली. तर कर्णधार दर्शन मिसाळने ७९ आणि सुयश प्रभुदेसाईने ७४ धावांचे योगदान दिले. स्नेहल कौठणकरनेही ६७ धावा केल्या. या डावात अर्जुन तेंडुलकरला फलंदाजीची संधी मिळाली नाही पण लक्ष्याचा बचाव करताना तो आपल्या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
अर्जुनचा प्रभावी मारा, फलंदाज हैराण
गोव्यासाठी अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. सुरुवातीच्या षटकांमध्ये तो खूपच प्रभावी ठरला. दुसऱ्या स्पेलमध्ये त्याला विकेट मिळायला लागल्या. एकामागून एक ३ फलंदाजांना तंबूत पाठवले आणि सामना पलटवला. अर्जुन तेंडुलकरने १० षटकांत ६.१० च्या इकॉनॉमी रेटने ६१ धावा दिल्या आणि एकूण ३ बळी घेतले. त्याने कार्तिक बिस्वाल, अभिषेक राऊत आणि राजेश मोहंती यांना बाद केले. अर्जुनशिवाय शुभम तारी आणि मोहित रेडकर यांनीही २-२ बळी घेत संघाला विजयाकडे नेले.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कशी होती कामगिरी?
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत अर्जुन तेंडुलकरची कामगिरी अत्यंत खराब होती. त्याला एकूण ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. पण या सामन्यांमध्ये तो फक्त १ बळी घेऊ शकला आणि त्यानंतर तो संघाबाहेर गेला. यानंतर अर्जुन तेंडुलकर दुबई काही काळ होता. पण आता त्याने दमदार कमबॅक केला आहे.