बेंगळूरू येथे सुरू असलेल्या के. थिमप्पाईया मेमोरियल टूर्नामेंटमध्ये क्रिकेटच्या दोन दिग्गजांच्या मुलांमध्ये रंजक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने भारताचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडला बाद केले.
क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या मुलांचा या सामन्यात आमना-सामना झाला. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी करताना समित द्रविडला बाद केले. गोवा आणि KSCA सेक्रेटरी XI यांच्यात झालेल्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी करताना समित द्रविडला आपले लक्ष्य केले. समितने २६ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने ९ धावा केल्या होत्या. पण, अर्जुनने त्याला गोलंदाजी करत कशाब बकलेच्या हाती झेल देण्यास भाग पाडले आणि पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्जुन तेंडुलकरने प्रभावी कामगिरी करत १७ षटकांत ५० धावा देत ३ गडी बाद केले.
या घटनेमुळे पुन्हा एकदा दोन्ही महान खेळाडूंच्या मुलांच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात हे दोन्ही युवा क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटमध्ये आपले नाव कमवतील अशी आशा आहे.