Join us

इंग्लंड क्रिकेटमध्ये वर्णभेद, भेदभाव, आयसीईसीचा अहवाल,कर्णधार बेन स्टोक्सने व्यक्त केली निराशा

England cricket: इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डमध्ये (ईसीबी) लैंगिक असमानता, वर्णभेद, भेदभाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे इंडिपेंडेंट कमिशन फॉर इक्विटी इन क्रिकेट (आयसीईसी) या संस्थेने मंगळवारी रात्री प्रकाशित केलेल्या अहवालाद्वारे स्पष्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 06:30 IST

Open in App

लंडन -  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डमध्ये (ईसीबी) लैंगिक असमानता, वर्णभेद, भेदभाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे इंडिपेंडेंट कमिशन फॉर इक्विटी इन क्रिकेट (आयसीईसी) या संस्थेने मंगळवारी रात्री प्रकाशित केलेल्या अहवालाद्वारे स्पष्ट केले. क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या देशाच्या बोर्डमध्येच हा प्रकार होत असल्याने क्रिकेटविश्वासाठी हा अहवाल धक्कादायक ठरला. यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स यानेही हे निराशाजनक असल्याचे सांगितले. 

आयसीईसीने आपल्या दोन वर्षांच्या तपासानंतर हा अहवाल सादर केला. त्यांनी सादर केलेला हा अहवाल ३१७ पानांचा असून, यामध्ये सुमारे ४ हजारांहून अधिक खेळाडू, प्रशिक्षक, प्रशासक आणि चाहते यांच्याशी संवाद साधून त्यांना आलेल्या अनुभवाचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला. त्याचप्रमाणे ईसीबीने आपल्या या अपयशी कामाविषयी थेट जाहीरपणे माफी मागावी, अशी शिफारसही केली आहे. याप्रकरणी आयसीईसीचे अध्यक्ष सिंडी बट्स यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की, हे एक कठोर वास्तव आहे की, क्रिकेट प्रत्येकाचा खेळ नाही. हे चित्र बदलण्यासाठी लगेच काम सुरू करावे लागेल. यामध्ये काही शंका नाही की, आता ईसीबीला चांगल्या नेतृत्वाची गरज आहे. मला विश्वास आहे की, आम्ही ज्या काही शिफारशी या सुचवल्या आहेत, त्यानुसार ईसीबीचे पदाधिकारी कार्यरत राहतील आणि पुढे वाटचाल करतील.

यानंतर दुसऱ्या ॲशेस सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत यावर प्रश्न विचारले असत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही नाराजी व्यक्त केली. स्टोक्स म्हणाला की, खेळांमध्ये काम करण्यासारखे खूप काही आहे. भेदभावाच्या भीतीविना खेळाचा आनंद घेतला गेला पाहिजे. काही व्यक्तींचे दु:खद अनुभव ऐकून खूप वाईट वाटले. क्रिकेट खेळाला विविधतेचा आनंद साजरा करण्याची गरज आहे. या खेळात प्रत्येकाकडे एक वेगळी गोष्ट आहे.

 

टॅग्स :इंग्लंडबेन स्टोक्सआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App