मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वन डे सामना कायम लक्षात राहील तो कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमामुळे. या सामन्यात विराटने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडला. विराटच्या विक्रमी खेळीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. विराटची पत्नी अनुष्का शर्मानेही एका विशेष अंदाजात हा आनंद साजरा केला.
अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर क्रिकेट सामन्यातील काही क्षणचित्रे शेअर केली आणि त्यावर "What a Man." असे लिहून प्रेमाची इमोजीही पोस्ट केले. अनुष्काचा आनंद व्यक्त करण्याची स्टाईल सर्वांना भावली.
![]()
विराटला चिअर करण्यासाठी अनुष्का अनेकदा स्टेडियमवरही उपस्थित राहिली आहे. ही जोडी विरुष्का म्हणूनही प्रसिद्ध आहे. विराटने दुसऱ्या सामन्यात 81वी धाव घेताच 10000 धावांचा पल्ला गाठला. त्याने 205 डावांमध्ये ही कामगिरी केली आणि त्याने तेंडुलकरचा विक्रम मोडला. तेंडुलकरला हा पल्ला गाठण्यासाठी 259 डाव खेळावे लागले होते.