गेल्या काही महिन्यात अनया बांगर हे नाव चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी हे नाव अस्तित्वात नव्हतं, पण आता हे नाव हळूहळू लोकांच्या परिचयाचं होत चाललंय. त्यामागची कहाणीही खास आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर याने लंडमध्ये लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर ती मुलगी झाली. तिने सर्वप्रकारच्या चाचण्या आणि सर्जरी पूर्ण करून परिपूर्ण मुलगी बनण्याचे शिवधनुष्य पेलले. आता ती अनाया बांगर या नावाने आपली ओळख निर्माण करत आहेत. सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा आहे. याच दरम्यान, 'काय मंडळी तुम्ही सगळे तयार आहात का...?' असा प्रश्न ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरने विचारला आहे. त्याचसोबत तिने एक मोठी घोषणाही केली आहे.
लिंगबदल करून मुलगी बनलेली अनया बांगर तिची नवी ओळख मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करत आहेत. आता ती तिची कहाणी संपूर्ण जगाला सांगणार आहे. याबद्दल तिने सोशल मीडियावर विचारले आहे - तुम्ही तयार आहात का? अनया बांगरने तिच्यावर बनवलेल्या डॉक्युमेंटरीच्या रिलीजबद्दल इंस्टाग्रामवर एक मोठी घोषणा केली आहे. तिने चाहत्यांना या खास कहाणीसाठी तयार राहायला सांगितले आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये अनया बांगरने तिची नवी ओळख कशी मिळवली हे सांगितले जाणार आहे.
दरम्यान, अनाया बांगर या नावाने ओळख मिळवलेल्या तिने BCCI आणि ICC कडे एक विशेष मागणी केली आहे. ही मागणी ट्रान्सजेंडर महिलांबद्दल आहे. उघडपणे आपली ओळख सांगणाऱ्या ट्रान्सजेंडर खेळाडू अनायाने क्रिकेटमधील समावेश आणि निष्पक्षतेबाबत मागणी केली आहे. तिने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ट्रान्सजेंडर महिलांसाठी धोरणे तयार करण्याचे आवाहन केले आहे. हे धोरण विज्ञान आणि डेटा यावर आधारित असावे असेही तिने म्हटले आहे. अनाया जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीत यूकेमधील मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट येथे ८ आठवड्यांच्या संशोधन शिबिरात सहभागी झाली होती. या संशोधनात हार्मोन थेरपी (HRT) ने तिची ताकद, सहनशक्ती, हिमोग्लोबिन, ग्लुकोज पातळी आणि क्रीडा कामगिरीवर कसा परिणाम केला, यावर विचार करण्यात आला. या सर्वांची तुलना सिसजेंडर (जन्मानुसार महिला) खेळाडूंशी करण्यात आली. संशोधनाच्या निकालांवरून हे स्पष्ट झाले की ती सिसजेंडर महिला खेळाडूंसारखीच आहे. त्यामुळे तिला क्रिकेटमध्ये संधी मिळावी अशी तिने मागणी केली आहे.