Join us

अमरावतीचा नेहाल अंडर-१९ भारत संघाकडून खेळणार

नेहाल खडसे याची श्रीलंका येथे १३ ऑक्टोबरपासून होणा-या अंडर १९ आयपीएल २०१७ च्या क्रिकेट सामन्यासाठी भारत संघाकडून तो खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 19:33 IST

Open in App

बडनेरा - बडनेरापासून जवळच असलेल्या अºहाड-कुºहाड गावातील अवघ्या १७ वर्षीय नेहाल खडसे याची श्रीलंका येथे १३ ऑक्टोबरपासून होणा-या अंडर १९ आयपीएल २०१७ च्या क्रिकेट सामन्यासाठी भारत संघाकडून तो खेळणार आहे. अल्पभूधारक शेतक-याच्या या मुलाने जिद्द बाळगून ही गरूडझेप घेतली आहे. 

नेहाल याचे आई-वडील मोलमजुरी करतात. वयाच्या सातव्या वर्षापासूनच तो क्रिकेट खेळाकडे वळला. मात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे पाहिजे तसे प्रोत्साहन त्याच्या आई-वडिलांना नेहालला देता आले नाही. मात्र त्याची व आई-वडिलांची जिद्द त्याला या खेळात पुढे नेत होती. त्याने जिल्हा व राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी बजावली. देशासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. 

अथक परिश्रम व जिद्दीच्या भरवशावर त्याने हे स्वप्न पूर्ण केले असून १३ ऑक्टोबरपासून श्रीलंका येथे होणा-या अंडर १९ आयपीएल ज्युनिअर लिग २०१७ साठी भारत संघाकडून तो खेळणार आहे. भारत विरूद्ध श्रीलंका अशी स्पर्धा होणार आहे. तीन सामने ष्ट्वेन्टी-२० चे दोन वंडे व एक टेस्ट मॅच होणार आहे. तो सध्या अकरावीत शिकत आहे.

एका लहानशा गावातील परंतु उत्तम खेळ प्रदर्शनामुळे त्याची निवड झाल्याने या परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याला परदेशात जायचे असल्याने तो शनिवारी बडनेरा पोलीस ठाण्यात पासपोर्ट मिळविण्यासाठी आला होता. पोलीस निरीक्षक डी.एम. पाटील यांनी त्याची दखल घेत पासपोर्ट मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या सामन्यात खेळण्याची संधी महाराष्ट्रातून नेहाल व पुण्यातील एका खेळाडूला मिळाली आहे. विदर्भातील तो एकमेव खेळाडू आहे, हे विशेष.

नेहाल अष्टपैलू खेळाडूनेहाल खडसे हा बॅट्समन व विकेट किपर यात पुढे आहे. यष्टीमागे उत्कृष्ट विकेटकिपरची भूमिका त्याने जिल्हा व राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत निभावली आहे. त्याबद्दल त्याला विविध पदकाने सन्मानितदेखील करण्यात आले आहे.  या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.