Helmet Story Kerala into Finals, Ranji Trophy 2025: केरळ संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेच्या ७४ वर्षांच्या इतिहासात त्याने प्रथमच ही कामगिरी केली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पहिल्या डावात फक्त २ धावांची घेतलेल्या आघाडीने या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरातविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केरळने हेल्मेटच्या मदतीने अतिशय रोमांचक पद्धतीने ही आघाडी मिळवली. जाणून घेऊया नेमका काय आहे हा प्रकार...
हेल्मेटमुळे केरळने इतिहास रचला
केरळ आणि गुजरात यांच्यातील उपांत्य सामना १७ फेब्रुवारी रोजी सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी केरळने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि १८७ षटकांत ४५७ धावांचा मोठा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल, गुजरातनेही पहिल्या डावात १७४ षटकांत ९ गडी गमावून ४५५ धावा केल्या. गुजरातला केरळची बरोबरी साधण्यासाठी आणि आघाडी घेण्यासाठी २ धावा हव्या होत्या. पण फक्त एकच विकेट शिल्लक होती. त्यावेळी नशिबाने केरळची साथ दिली.
पाहा व्हिडीओ-
१७५ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर गुजरातचा फलंदाज नागासवालाने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू शॉर्ट लेगवरील क्षेत्ररक्षक सलमान निजेरच्या हेल्मेटला लागला आणि पहिल्या स्लिपच्या दिशेने हवेत गेला. तिथे असलेल्या सचिन बेबीने तो झेल घेतला आणि अशाप्रकारे शेवटच्या विकेटसह पहिल्या डावात केरळला २ धावांची आघाडी मिळाली. सामन्यातील अजून दोन डावांचा खेळ बाकी आहे. पण २१ फेब्रुवारी हा या सामन्याचा शेवटचा दिवस सामना अनिर्णित राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे नियमांनुसार पहिल्या डावात आघाडी घेणारा संघ म्हणजेच केरळ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.