Join us

'सुनील गावसकर सरांचा नेहमीच आदर करा'; माजी क्रिकेटपटूने नाव न घेता सुनावले

आता इरफान पठाणने गावसकर यांना पाठिंबा दर्शविताना ट्वीट केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 13:16 IST

Open in App

मुंबई : किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) झालेल्या अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Banglore) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ट्रोल झाला. त्याच्या कामगिरीवर अनेकांनी टीका केली. मात्र माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी त्याच्यावर टीका करताना त्याच्या पत्नीचा अनुष्का शर्माचाही (Anushka Sharma) उल्लेख केला आणि सोशल मीडीयावर एकच गदारोळ सुरु झाला. यानंतर आयपीएलच्या समालोचन समितीतून गावसकर यांना हटविण्याचीही मागणी झाली. 

आता गावसकर यांना सपोर्ट करत इरफान पठाणने उडी घेतली असून त्याने गावसकर यांना पाठिंबा देताना कोणाचेही नाव न घेता अनुष्का शर्मावर निशाणा साधला आहे. गुरुवारी पंजाबविरुद्ध आरसीबी कर्णधार विराट कोहली सपशेल अपयशी ठरला. यानंतर गावसकर यांनी ‘विराटने लॉकडाऊमध्ये केवळ अनुष्काच्या गोलंदाजीवर सराव केला,’ अशी टीका केली.

यावर अनुष्काने सोशल मीडीयाद्वारे गावसकर यांना उत्तर दिले की, ‘तुमची प्रतिक्रिया त्रासदायक आहे, परंतु पतीच्या कामगिरीसाठी पत्नीला जबाबदार धरण्याचं विधान का केलंत? याच उत्तर मला द्यायला आवडेल. गेली अनेक वर्षे एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केलाच असेल, याची मला खात्री आहे. मग, आम्हालाही असाच आदर मिळावा, असे तुम्हाला वाटंत नाही का? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना नक्कीच तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार होता किंवा तुमचे विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नव्हतं का?’

या प्रकरणानंतर आता इरफानने गावसकर यांना पाठिंबा दर्शविताना ट्वीट केले की, ‘सुनील गावसकर सरांचा नेहमीच आदर करा, नेहमीच.’ पठाणने या वेळी कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्याच्या या ट्वीटचा रोख अनुष्कावर होता. पठाण या ट्वीटवर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. अनेकांनी अनुष्काची बाजू घेतली, तर अनेकांनी गावसकर यांना आदर मिळायलाच हवा असे सांगत पठाणचे समर्थनही केले. 

टॅग्स :सुनील गावसकरइरफान पठाणविराट कोहलीअनुष्का शर्माIPL 2020