IPL 2024 Auction - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी उद्या दुबईत लिलाव होणार आहे. हा मिनी ऑक्शन असणार आहे. पण, आयपीएल २०२५ ला होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. आयपीएलमधील १० फ्रँचायझींनी रिटेन व रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवली आहे. बीसीसीआयच्या माहितीनुसार लिलावासाठी एकूण ११६६ खेळाडूंनी नोंदणी केली होती, त्यापैकी संघांनी ३३३ नावे निवडली आहेत. यामध्ये २१४ भारतीय आणि ११९ परदेशी खेळाडू, यापैकी ११६ खेळाडू कॅप केलेले आहेत, २१५ अनकॅप खेळाडू आहेत आणि दोन खेळाडू असोसिएट राष्ट्रांचे आहेत. १० संघांमध्ये एकूण ७७ जागांसाठी लिलाव होणार आहे आणि त्यापैकी ३० जागा या परदेशी खेळाडूंसाठी आहेत.
मुंबई इंडियन्स हा सुपरस्टार्सचा संघ! हार्दिकच्या विधानावर रोहित म्हणालेला, मेहनत घेतो, उगाच...
१९ डिसेंबरला प्रथमच भारताबाहेर म्हणजेच दुबईमध्ये लिलाव होणार आहे. सुधारित वेळेनुसार दुपारी १ वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. या लिलावासाठी गुजरात टायटन्सकडे सर्वात जास्त रक्कम म्हणजेच ३८.१५ कोटी शिल्लक आहेत. ८ खेळाडूंसाठी ( २ परदेशी) त्यांना ही रक्कम खर्ची घालायची आहे. हार्दिक पांड्याच्या रिप्लेसमेंटसाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सकडे सर्वात कमी म्हणजेच १३.१५ कोटी रक्कम शिल्लक आहे. त्यांच्या संघात सहा जागा रिक्त आहेत आणि त्यांनाही दोन परदेशी खेळाडूंना घ्यायचे आहे. लिलावात एकूण २६२.९५ कोटी १० फ्रँचायझी खर्च करणार आहेत. खेळाडूंची १९ वेगवेगळ्या सेटमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
एकूण २३ खेळाडूंनी सर्वोच्च आधारभूत किंमत ब्रॅकेटमध्ये नोंदणी केली आहे. २ कोटींच्या ब्रॅकेटमध्ये मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड, उमेश यादव आणि शार्दूल ठाकूर या प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे. १३ खेळाडूंनी त्यांची मूळ किंमत १.५ कोटी ठेवली गेली आहे. बेन स्टोक्स, जो रूट आणि जोफ्रा आर्चर या इंग्लिश खेळाडूंनी यंदाच्या आयपीएलमधून त्यांच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करण्यासाठी माघार घेतली आहे. ८ वर्षांच्या विश्रांतीनंतर मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये खेळणार आहे आणि त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. रचिन रवींद्रने त्याची मूळ किंमत ५० लाख ठेवली आहे आणि त्याने नुकत्याच पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दमदार खेळ केला होता आणि त्यामुळे त्यालाही मोठी बोली मिळू शकते. अनकॅप खेळाडूंमध्ये अर्शीन कुलकर्णी, कुमार कुशाग्रा आणि मुशीर खान यांच्यावर लक्ष असेल.
![]()