लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ड्रग्स चाचणी दोषी आढळलेल्या प्रमुख फलंदाज अॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ड्रग्स चाचणीत दोषी आढळलेल्या हेल्सवर 21 दिवसांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. पण, ही शिक्षा पुरेशी नसल्याचे मत इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केली. त्यामुळे हेल्सचा वर्ल्ड कप साठी जाहीर केलेल्या 15 सदस्यीय चमूतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडने नुकताच वन डे संघ जाहीर केला आणि त्यात हेल्सचाही समावेश होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या ड्रग्स चाचणीत हेल्स दुसऱ्यांदा दोषी आढळला आहे.
शिवाय त्याला आयर्लंडविरुद्धच्या एकमेव वन डे सामन्यातून आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतूनही वगळण्यात आले आहे. इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे व्यवस्थापकीय संचालक अॅश्ली जाईल्स यांनी सांगितले की,''या निर्णय घेण्यापूर्वी आम्ही बरीच चर्चा केली. इंग्लंड संघातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे संघाच हित लक्षात ठेवूनच आम्ही हा निर्णय घेत आहोत. इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणून हेल्सची कारकीर्द संपलेली नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्ड त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. तो एक चांगला क्रिकेटपटू आहे.''
हेल्सने इंग्लंडकडून 70 वन डे सामन्यात 95.72च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 6 शतकं आहेत आणि 171 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. हेल्सच्या जागी वर्ल्ड कप संघात कोणाला संधी मिळेल, याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.