- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
इंग्लंडने कसोटी मालिका जिंकलेली असली, तरी अखेरचा सामना त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. अॅलिस्टर कूकची अखेरची कसोटी लढत असल्याने हा सामना त्यांच्यासाठी भावनिक आहे. त्याची कारकिर्द जबरदस्त असून एक सलामीवीर म्हणून त्याने १६१ कसोटी सामने खेळले आहेत. माझ्या मते सलामीवीरांची जागा खूप वेगळी असते. कारण त्याला कायम नव्या चेंडूला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे सलामीवीराच्या खेळीवरच संघाची कमागिरी मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळेच मला वाटते कूकच्या रूपाने इंग्लंडला एक सर्वोत्तम सलामीवीर मिळाला आहे. एक व्यक्तिमत्त्व म्हणूनही तो जबरदस्त आहेच; शिवाय कर्णधार म्हणूनही त्याने छाप पाडली आहे. त्याने आपल्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच भारताला भारतात नमवले. शिवाय अॅशेस मालिकेत त्याने इंग्लंडला मायदेशात व आॅस्टेÑलियामध्येही यशस्वी केले आहे. केवळ केविन पिटरसनसोबतचे प्रकरण त्याच्या कारकिर्दीत वादग्रस्त राहिले आहे. पिटसरनला संघाबाहेर करण्यावरून त्या वेळी मोठा वाद झाला होता. नुकताच या प्रकरणी कूकने खुलासा केला होता, की पिटरसनला बाहेर करण्याची त्याची इच्छा नव्हती, पण परिस्थितीमुळे त्याला संघाबाहेर करावे लागले. हे एक प्रकरण सोडले, तर कूकची कारकिर्द शानदार ठरली आहे.
अखेरच्या सामन्यात मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉची निवड करायला हवी होती. मालिकेत दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले; आणि त्यांच्याकडून अपेक्षित भागीदारीही झाली नाही. त्यामुळे नव्या फलंदाजाला खेळविण्याची ही संधी होती. तसेही पृथ्वीला इंग्लंडमध्ये खेळण्याचा खूप चांगला अनुभव आहे. शिवाय त्याने चांगल्या प्रकारे धावाही काढल्या आहेत. करुण नायर पूर्ण दौऱ्यात ‘पर्यटक’ म्हणून राहिला आहे. तो मधल्या फळीत अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना पर्याय आहे. पण त्याचा ‘सलामीवीर’ म्हणूनही उपयोग करता आला असता. सहा फलंदाज खेळविण्याचा निर्णय झाला असता, तर करुणचा विचार झाला असता.