Join us  

अॅलिस्टर कुक... जिंकलंस मित्रा

क्रिकेट चाहत्यांना अवीट आनंद देणाऱ्या जंटलमन कुकला एक अनावृत पत्र

By प्रसाद लाड | Published: September 11, 2018 3:30 PM

Open in App
ठळक मुद्देअखेरच्या सामन्यातही तू बरेच विक्रम केलेस. जे सर डॉन ब्रॅडमन, गावस्कर, लॉइड, रीचर्ड्स, लारा, सचिन, द्रविड यांना जमलं नाही ते तु अखेरच्या सामन्यात करून दाखवलंस.

प्रिय अॅलिस्टर...सध्याच्या घडीला पत्रं लिहावं असे फार तुरळक खेळाडू क्रिकेट विश्वात आहेत. त्यामध्ये आघाडीला तूच. पाच वर्षांपूर्वी एक पत्र लिहलं होतं ते सचिन तेंडुलकरला. निवृत्तीच्याच वेळी. साल 2013. त्यानंतर आता तुला. सचिनला पत्र लिहिणं ठिक होतं. कारण तो आमच्या भारताचा होता. तु तर इंग्लंडचा. ज्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं त्या देशाचा(पण तू तसा खाष्ट, द्वेष करण्यासारखा नाहीस). पण तरीही तुला पत्र लिहावं वाटलं, कारण तुझी जादू अजूनही कायम आहे. तुझं गारुडं मनात पिंगा घालतंय. कारण आतापर्यंत बरेच स्वर्गीय आनंदाचे क्षण तु आम्हाला दिलेस. अगदी अखेरच्या सामन्यातही. जाता जाता पण तु मोहिनी घातलीस. आता थाटात, मानसन्मानाने तु निवृत्त होतोयस, ही आमच्यासाठीही सुखावह अशीच बाब.

तु खरंतर आमच्या प्रतिस्पर्धी संघातला. तरीही तुझं शतक व्हावं, त्यानंतर द्विशतक पूर्ण करावं, अशी आमचीही इच्छा होती. कारण खेळासह तुझ्यातला जंटलमन क्रिकेटपटू आमच्या मनात कायम राहील.  वाद-विवाद, भांडणं, आक्रस्ताळेपणा, डिवचणं, असं कधीही तुझ्याकडून पाहायला मिळालं नाही. आपण फक्त क्रिकेट या खेळाचे सेवक आहोत. नम्रपणे ही सेवा यथाशक्ती पार पाडायची, हा तुझा शुद्ध हेतू आम्हालाही तुझ्या वर्तनातून दिसला. तुझा हसरा चेहरा, त्यावरचं तेज, तुझे फटके, तुझं वागणं, सारं काही लोभसं असंच होतं. मोजक्या शब्दांत सांगायचं तर तु आमच्यासाठी ' राजस (सुकुमार) ' आहेस.

अखेरच्या सामन्यातही तू बरेच विक्रम केलेस. जे सर डॉन ब्रॅडमन, गावस्कर, लॉइड, रीचर्ड्स, लारा, सचिन, द्रविड यांना जमलं नाही ते तु अखेरच्या सामन्यात करून दाखवलंस. सर्वात जास्त धावा करणारा सलामीवीरही तूच आणि डावखुरा फलंदाजही तुच ठरलास. तुझं 33वं शतक झालं तेव्हा क्रिकेट जगताने जल्लोश केला, अगदी तुझ्या प्रतिस्पर्धी देशातील चाहत्यांनीही. शतक झाल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंचा आनंद गगनात मावेनासा होता. कारण तु त्यांना घडवलं होतंस. रुटने ज्यापद्धतीने तुला मिठी मारली, त्याचे शब्दांत वर्णन करता येणं सोपं नाही. प्रेक्षकांनी तर टाळ्यांचा एवढा गजर केला की तो थांबतच नव्हता. सुरुवातीला तु मानवंदना स्वीकारलीस. त्यानंतर तु क्रीझमध्ये गेलास. तरीही प्रेक्षकांच्या टाळ्या काही केल्या थांबत नव्हता. तु काय कमावलंस तर ती ही गोष्ट. लोकांच्या मनात केलेलं घर. अनेकांच्या गळ्यातील ताइत तु आहेस, हे समजून आलं.

तुझं शतक झालं. एवढा जल्लोश सुरु होता. पण त्यावेळी भारताच्या एकाही खेळाडूने तुला हात मिळवला नाही. काही वर्षांपूर्वी असं होत नसे. पण यावेळी झालं. तो त्यांचा कद्रूपणा होता कि व्यावसायिकपणा हे तेच जाणोत. पण त्यांच्यावतीने मी तुझी माफी मागतो. तुझी माफी मागतानाही बरं वाटतं. कारण तु रागावणार नाहीस, हे माहिती असतं. तुझ्या चेहऱ्यावरचं स्मित आम्हालाही ताजतवानं करत. त्यामुळे तुझी माफी मागायला किंवा तुझे कौतुक करताना आम्ही कधीच कुचराइ करू शकत नाही.

तुझा संपूर्ण प्रवास डोळ्यापुढे आहेस. नागपूरला 12 वर्षांपूर्वी पदार्पण करणारा तू. तेव्हा मिसरूडही फुटली नव्हती तुला. आणि आता तर क्रिकेटच्या मैदानात खेळून केस पिकले असतील तुझे. तो शतकवीर कुक. केव्हिन पीटरसनला शासन करणारा तू, पीटरसनला शासन केल्यावर ती सल मनात ठेवणारा हळवा खेळाडूही तुच, अॅशेस मालिका जिंकवून देणारा तू, भारतात इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा तू, गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरलेला तू आणि अखेरचा सामना गाजवणारा तू, अशी बारा वर्षांची तुझी कारकिर्द. एक चाहता म्हणून आम्हाला सुखावून जाणारा हा एक अल्हाददायक असा प्रवास होता हा. 

12 वर्षांचं तप पूर्ण करणारा तू तपस्वी आहेस. एखाद्या संतासारखा नेहमी तू समोर आला आहेस. एक खेळाडू कसा असायला हवा, याचे आदर्शवत उदाहरण तु आहेस. हा जंटलमन्स गेम आहे, हे सांगणारा ही तुच आहेस. एवढी बारा वर्षांची कारकिर्द तुझी, पण कधीही नखरे केले नाहीस. अगदी सोमवारीही शतक झळकावल्यावर तु क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला होतास. पहिल्या षटकानंतर यष्टीरक्षकासह अन्य स्लीपमधले खेळाडूही निघाले होते. पण तु थांबलास. यष्टीरक्षकाच्या मागचे हॅल्मेट तु उचललेस आणि त्यानंतर तु निघालास. याला काय म्हणावं.

तु जर भारतात असला असतास तर अजून 3-4 वर्ष सहज खेळू शकला असतास. कारण आमच्या देशात खेळ धर्म होतो, खेळाडूंना कथित देवत्व बहाल होतं. निवृत्तीच्या वेळी आमच्या भारतातले खेळाडू म्हातारे झालेले असतात. त्यांना क्षेत्ररक्षण करताना लपवावे लागते. पण तू स्लीप तर सोडाच, सिली पॉइंट आणि शॉर्ट लेगलाही उभा राहिला होतास. अगदी शेवटच्या सामन्यातही.

आता भारतासह बऱ्याच देशातले चाहते, तु निवृत्त होऊ नकोस, असं म्हणतील. यापुढेही तु खेळत राहा, असं सांगशील. पण निवृत्तीचं टायमिंग तु तुझ्या फटक्यांसारखं अचूक साधलं आहेस. अशी निवृत्ती आतापर्यंत कुणाच्या वाट्याला आली नसावी. क्रिकेट जगतातील महाराजा म्हणून तू निवृत्त होत आहेस. हीच गोष्ट सर्वात सुखावणारी आहे. तुझ्या कारकिर्दीची सुरुवात आणि शेवटही शतकाने झालाय, अजून तुझ्यासारख्या गंधर्वाला काय हवंय. निवृत्त झालास तरी तुझे स्थान आमच्या मनात कायम राहील. यापुढे समालोचक किंवा प्रशिक्षक या रुपात तु आम्हाला भेटावंस, एवढीच इच्छा आहे. आम्हाला माहिती आहे तू शेती करतोस. मेंढीपालन करतोस. पण यापुढेही तुझ्या हातून क्रिकेटची सेवा घडावी, असंच वाटतं. म्हणून हा सारा प्रपंच. पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा.

तुझा चाहता

प्रसाद रमेश लाड.

टॅग्स :अॅलिस्टर कुकइंग्लंडभारत