ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी शुभमन गिल या युवा खेळाडूची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला संघातून वगळणे आणि रोहित शर्मा-विराट कोहली यांचे २०२७ च्या विश्वचषकातील स्थान याबद्दल चर्चा केली आहे.
मोहम्मद शमीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह
मोहम्मद शमीला संघातून वगळल्याबद्दल विचारले असता, अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की शमी हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, त्याच्या फिटनेसच्या समस्यांवर त्यांनी बोट ठेवले. आगरकर म्हणाले, "इंग्लंड दौऱ्यापूर्वीच आम्ही सांगितले होते की जर शमी तंदुरुस्त असता तर तो संघाचा भाग असता. आमचा देशांतर्गत हंगाम नुकताच सुरू झाला आहे. त्याची तंदुरुस्ती कशी आहे आणि फॉर्म कसा आहे? हे आपल्याला काही सामन्यांमध्ये कळेल. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर आपण शमीसारख्या गोलंदाजाला बाहेर कसे ठेवू शकतो? गेल्या सहा महिन्यापासून तो फिटनेसशी झुंज देतोय.
रोहित-विराटबद्दल २०२७ साठी स्पष्टता नाही
सर्वाधिक चर्चेत असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याच्या मुद्द्यावरही आगरकर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. रोहित आणि कोहली दोघेही उत्तम खेळाडू आहेत आणि त्यांना प्रत्येक सामन्यात स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही. पण असे अनेक युवा खेळाडू आहेत, जे त्यांची जागा घेऊ शकतात. रोहित आणि विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन शतके झळकावली किंवा अजिबात धावा काढल्या नाहीत तरी, तो विश्वचषकात खेळेल की नाही? हे अद्याप स्पष्ट नाही. मालिकेनंतरच्या परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ." आगरकर यांनी संघाचे ध्येय वैयक्तिक धावांकडे नसून ट्रॉफी जिंकण्याकडे असल्याचे यावेळी अधोरेखित केले.