हॅम्पशायर : भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम केला. हॅम्पशायर क्लबकडून खेळताना नॉटिंघमशायर क्लबच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 2 बाद 9 धावा अशा परिस्थितीत मैदानावर आलेल्या रहाणेने कर्णधार सॅमसोबत 257 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पहिल्या डावात रहाणेला 10 धावा करता आल्या होत्या.
इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक बॉल यांचा सामना करताना रहाणेने शतकी खेळी साकारली. त्याच्या 119 धावांच्या जोरावर हॅम्पशायरने 337 धावांची आघाडी घेतली. रहाणेने कसोटी क्रिकेटमध्ये 17 शतकं झळकावली आहेत.
कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा रहाणे हा तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी मुरली विजय ( 2018, एसेक्स) आणि पियूष चावला ( 2008, ससेक्स) यांनी ही कामगिरी केली आहे.