देशात मागील २४ तासात ४ लाख १,०७८ नव्या रुग्णांची भर झाली आहे आणि ४१८७ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असताना १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना कोरोना लस घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूही यासाठी पात्र ठरले आहेत. भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व त्याची पत्नी राधिका यांनी शनिवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. अजिंक्यनं सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करून इतरांनाही कोरोना लसीसाठी नाव नोंदवण्याचे आवाहन केलं. याआधी भारताचा सलामीवीर शिखर धवन यानंही कोरोना लस घेतानाचा फोटो पोस्ट केला होता.
भारतीय क्रिकेटपटूंना इंग्लंडला जाण्यापूर्वी घ्यावी लागेल फक्त कोव्हिशिल्डचीच लसभारतीय खेळाडू काही दिवसांसाठी कुटुंबीयासोबत राहणार असून नंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहेत. १८ ते २३ जून या कालावधीत तेथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल होणार आहे आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आतापासून तयारीला लागले आहेत. चार महिन्यांचा हा दौरा आहे, त्याला रवाना होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना फक्त कोव्हिशिल्ड ( Covishield ) ची लस घ्यावी लागेल, असे वृत्त Times Nowने प्रसिद्ध केलं आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय खेळाडू लंडनमध्ये जाणार आहेत. त्यांना दुसरा डोस घेता येणार नाही. कोव्हिशिल्ड ही लसीचा दुसरा डोस खेळाडूंना लंडनमध्येही घेता येईल, त्यामुळे हा सल्ला देण्यात आला आहे. ''कोव्हिशिल्ड ही लंडनच्या AstraZeneca vaccineच उत्पादन आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना दुसरा डोस तिथे घेता येईल,''असे सूत्रांनी सांगितले.