भारताच्या कसोटी संघाचा माजी उप कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याच्या घरी पुन्हा पाळणा हलला आहे. त्याच्या घरी गोंडस बाळाने जन्म घेतले आहे. अजिंक्यने ट्विट करून पुत्ररत्न प्राप्तीची आनंदाची बातमी चाहत्यांना सांगितली आहे. ''आज सकाळी राधिका आणि मी मुलाचे या जगात स्वागत केले. राधिका आणि बाळ यांची प्रकृती एकदम ठणठणीत आहे,''असे अजिंक्यने ट्विट केले.
अजिंक्य आणि राधिका धोपावकर हे शाळेतील मित्र...ही दोघ सोबतच लहानाची मोठी झाली आणि या प्रवासात त्यांची मनंही जुळत गेली. याबाबत त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगितलं नव्हतं. पण, या दोघांमधील प्रेम घरच्यांना कळलं होतं आणि त्यांनीच दोघांना एकमेकांशी लग्न कराल का, असे विचारले. या दोघांनीही त्वरीत होकार कळवला. 26सप्टेंबर 2014मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला. अजिंक्य व राधिका यांना पहिली कन्या आहे आणि आर्या असे तिचं नाव आहे.