केरळ क्रिकेट लीगच्या ११ व्या सामन्यात थ्रिसूर टायटन्सचा सामना कोची ब्लू टायगर्सशी झाला. या सामन्यात थ्रिसूर टायटन्स संघाने ५ विकेट्सने विजय मिळवला. कोची ब्लू टायगर्सचा हा पहिला पराभव आहे. थ्रिसूर संघाच्या विजयात फिरकी गोलंदाज अजिनसने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात हॅट्रिकसह पाच विकेट्स घेतल्या. अजिनसची कामगिरी पाहून अनेकजण चकीत झाले. यापुढेही तो अशीच कामगिरी करत राहिला तर, एक दिवस नक्कीच भारतीय संघात त्याला संधी मिळेल, असे मत क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून थ्रिसूर टायटन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात संजू सॅमसनने कोचीच्या बाजूने ४६ चेंडूत ८९ धावा करून संघाला चांगली सुरुवात दिली. परंतु, अजिनसने त्याच्या एका षटकात संपूर्ण सामन्याचे रुप बदलले. १८ व्या षटकात हॅट्रिक घेऊन त्याने कोचीला बॅकफूटवर ढकलले.
अजिनसची भेदक गोलंदाजी
अजिनसने १८व्या षटकात संजू सॅमसन, जेरिन पीएस आणि मोहम्मद आशिकसारख्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ३० धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे कोची संघ २० षटकांत फक्त १८८ धावाच करू शकला.
थ्रिसूर टायटन्सचा पाच विकेट्सने विजय
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या थ्रिसूर टायटन्स संघाने पाच विकेट्स राखून हा सामना जिंकला. थ्रिसूरकडून अहमद इम्रानने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याने ४० चेंडूंच्या डावात ७ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याच्याशिवाय, कर्णधार सिजोमोन जोसेफ आणि अर्जुन एके यांनी खालच्या क्रमात स्फोटक फलंदाजी केली. यामुळे, त्रिशूर टायटन्स संघ शेवटच्या चेंडूवर सामना जिंकण्यात यशस्वी झाला.