Join us

आक्रमकतेचा परिणाम खेळावर होता कामा नये- झहीर खान

क्रिकेटच्या प्रसारासाठी खेळाचे छोटे स्वरूप फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 01:35 IST

Open in App

- रोहित नाईक मुंबई : ‘आक्रमकता आणि खेळ यामध्ये ताळमेळ साधता आला पाहिजे, तर खेळाडू यशस्वी होईल. खेळाडूंमध्ये आक्रमकता असावी, पण त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होता कामा नये,’ असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.सोमवारी मुंबईत टी१० क्रिकेट लीग स्पर्धेच्या तिसऱ्या सत्राची घोषणा करण्यात आली. या वेळी उपस्थित असलेल्या झहीरने ‘लोकमत’शी संवाद साधला. त्याने म्हटले की, ‘चेतेश्वर पुजारासारखे काही खेळाडू असे आहेत, जे आपल्या वागण्यातून नाही, पण खेळातून आक्रमकता दाखवता. त्याउलट विराट कोहलीचे उदाहरण घ्याल तर तो आक्रमक झाल्यानंतर सर्वोत्तम खेळ करतो. प्रत्येक खेळाडूची एक वेगळी शैली असते.’क्रिकेटचे सर्वांत लहान स्वरूप असलेल्या टी१० लीगविषयी झहीर म्हणाला, ‘क्रिकेटचा प्रसार जास्त देशांमध्ये करायचा असेल, तर खेळाचे लहान स्वरूप नव्या देशांसाठी खूप फायदेशीर ठरेल. क्रिकेटच्या छोट्या प्रकारात निकालाच्या बाबतीत काहीही होऊ शकते. त्यामुळे जिंकण्याची समान संधी सर्व संघांना असते आणि प्रेक्षकांनाही आनंद घेता येतो.’वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविषयी झहीरने सांगितले की, ‘बुमराह कमी कालावधीमध्ये खूप काही शिकलाय. पुढेही त्याने अशीच कामगिरी करावी. त्याने आता स्विंगवर अधिक लक्ष देऊन उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजांविरुद्ध चेंडू आऊटस्विंग करण्यावर भर द्यावा. यामुळे त्याची गोलंदाजी अधिक भेदक होईल. गोलंदाजीची विशिष्ट शैली त्याची सर्वांत मोठी ताकद आहे.’मुंबईची कामगिरी नक्की उंचावेल‘मुंबई क्रिकेटचा स्तर इतका उंच आहे की मुंबईविरुद्ध खेळणाऱ्या प्रत्येक संघाला जाणीव असते की मुंबईविरुद्ध कशा प्रकारे खेळावे लागेल. प्रत्येक संघासाठी एक-दोन वर्षे वर-खाली ठरतात.एकूणच अजूनही मुंबई क्रिकेट सकारात्मक असून नक्कीच आपल्याला देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी पाहण्यास मिळेल,’ असा विश्वासही झहीरने या वेळी व्यक्त केला.कोणत्याही खेळाचे यश हे त्या खेळात मिळविलेल्या विजयांवर अवलंबून असते. माझ्या मते हेच क्रिकेटच्या यशाचे गुपित आहे. पण आज भारतात इतर खेळांनीही खूप प्रगती केली असून पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, महेश भूपती यांसारख्या अनेक खेळाडूंनी सातत्याने आपल्या खेळात विजयी कामगिरी केली. यामुळेच आज भारतात इतर खेळही लोकप्रिय होऊ लागले आहेत.- झहीर खान

टॅग्स :झहीर खान