मुंबई - मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीसाठी मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश कारणीभूत असल्याचे मत भारताची माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने व्यक्त केले.
रोहितने डावाची सुरुवात करावी किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असे आगरकरचे मत आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्स तळाच्या स्थानावर असून प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे. आगरकर म्हणाला,‘मुंबई संघाची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे, पण त्यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईच्या फलंदाजांनी विशेषता मधल्या फळीने निराश केले.’
आगरकर पुढे म्हणाला, ‘मुंबई इंडियन्सने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. रोहितने चांगली कामगिरी करण्यासह अन्य फलंदाजांची त्याला साथ लाभायला हवी. सूर्यकुमार यादव चांगली कामगिरी करीत आहे. त्याच्या व्यतिरिक्त फलंदाजीमध्ये कुणी मॅच विनर दिसत नाही आणि ही चिंतेची बाब आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू किएरॉन पोलार्डच्या खराब फॉर्ममुळे संघ निराश झाला. पोलार्डला सूर गवसावा, असे संघाला वाटते. त्याचा आत्मविश्वास ढासळलेला आहे. फलंदाजीदरम्यान अखेरच्या षटकांमध्ये संघ त्याच्या फलंदाजीवर बºयाच अंशी अवलंबून असतो, पण यंदा मात्र तसे दिसले नाही.’