Join us  

India Vs South Africa, 2nd Test: भारताचा दारुण पराभव, मालिकाही गमावली

पहिल्या कसोटीप्रमाणे दुस-या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 2:26 PM

Open in App
ठळक मुद्देचेतेश्वर पूजारा (19) धावांवर धावबाद झाला तर पार्थिव पटेलला (19) धावांवर रबाडाने मॉर्केलकरवी झेलबाद केले. तडाखेबंद फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि डीन एल्गर यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसºया डावात सर्व बाद २५८ धावा करीत भारताला २८७ धावांचे आव्हान दिले.

सेंच्युरियन - पहिल्या कसोटीप्रमाणे दुस-या कसोटी सामन्यातही दक्षिण आफ्रिकेने भारतावर 135 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव 151 धावांवर आटोपला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

दुस-या डावात भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 47 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून एन्गिडीने सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने सहा विकेट घेतल्या. रबाडाने तीन गडी बाद करुन त्याला चांगली साथ दिली.  आज कसोटीचा अखेरचा दिवस होता.  कालच्या 3 बाद 35 वरुन आज सकाळी डाव पुढे सुरु झाल्यानंतर भारताला चेतेश्वर पूजार आणि पार्थिव पटेलच्या रुपाने आणखी दोन धक्के बसले. 

चेतेश्वर पूजारा (19) धावांवर धावबाद झाला तर पार्थिव पटेलला (19) धावांवर रबाडाने मॉर्केलकरवी झेलबाद केले. 65 धावात भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. कसोटीवर दक्षिण आफ्रिकेने आपली पकड अधिक घट्ट केली आहे. भारताला विजयासाठी 287 धावांचे टार्गेट मिळाले होते.          

लुंगी एन्गिडीने भारताच्या के. राहुल (४) आणि कर्णधार विराट कोहली (५) व रबाडाने मुरली विजयला (९) धावांवर बाद करुन भारताची दुस-या डावात ३ बाद ३५ अशी दयनीय अवस्था केली होती.  तडाखेबंद फलंदाज एबी डिव्हिलियर्स आणि डीन एल्गर यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसºया डावात सर्व बाद २५८ धावा करीत भारताला २८७ धावांचे आव्हान दिले.तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेने २ बाद ९० धावांवरून सुरुवात केली. एबी डिव्हिलियर्स (८० धावा) याने सलामीवीर डीन एल्गर (६१ धावा)

याच्यासोबत तिसºया गड्यासाठी १४१ धावांची भक्कम भागीदारी केली. संघ १४४ धावांवर असताना डिव्हिलियर्स बाद झाला. त्यानंतर लगेचच एल्गरही परतला. चहापानाच्या वेळी कागिसो रबाडा आणि फाफ डु प्लेसिस खेळत होते. फाफ डु प्लेसिस याने व्हर्नोन फिलँडरसोबत सहाव्या गड्यासाठी ४६ धावांची भागीदारी केली. या दोघांनी १५६ चेंडूंचा सामना केला. त्यानंतर इशांत शर्मा याने ७४ व्या षटकात फिलँडर याला शॉर्ट चेंडूवर मुरली विजयकडे झेल देण्यास भाग पाडले. दोन षटकांनंतर शर्मा यानेच केशव महाराजला बाद करीत आफ्रिकेचा सातवा गडी बाद केला.

८० षटकांनंतरही भारताचा नवा चेंडू न घेण्याचा निर्णय हैराण करणारा होता. तसेच ४ गडी बाद करणा-या मोहम्मद शमी याला दुस-या सत्रात फक्त एकच षटक देण्यात आले. भारताकडून आक्रमणाची सुरुवात जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी केली. डिव्हिलियर्स आणि एल्गर यांनी पहिल्या तासाभरातच ५४ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी १६७ चेंडूंत १०० धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेने ४३ व्या षटकातच १५० धावा पूर्ण केल्या.

त्यानंतर शमीने भारताला पुनरागमन करून दिले. शमीने डिव्हिलियर्सला पार्थिव पटेलकरवी झेलबाद केले. चार षटकांत एल्गरदेखील शमीच्या चेंडूवर लोकेश राहुलकडे झेल देऊन परतला.फाफ डु प्लेसिस ६ धावांवर असताना लोकेश राहुल याने त्याचा झेल सोडला. डीकॉकला पार्थिव पटेल यानेच जीवदान दिले. मात्र शमीने डीकॉकला बाद करत आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला.                                                                              

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८