Join us  

विराटनंतर रोहितला मिळू शकते कर्णधारपद; टी-२० विश्वचषकानंतर कोहली पद सोडणार 

वन डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 7:08 AM

Open in App

दुबई : क्रिकेटच्या तिनही प्रकारात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविणाऱ्या विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. यूएईत १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर तो नेतृत्वपदावरुन दूर होणार आहे. कोहली वन डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी मात्र कायम असेल विराटच्या टी२० कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयानंतर सर्वांच्या नजरा रोहित शर्माकडे वळल्या आहे. कारण रोहितचा एकंदर अनुभव आणि टी२० मध्ये कर्णधार म्हणून असलेला त्याचे रेकॉर्ड बघता तोच कर्णधारपदाचा प्रमुख दावेदार म्हणून पुढे आला आहे.

पत्रात काय म्हणाला कोहली...

- टी-२० चे कर्णधारपद सोडायची घोषणा करणाऱ्या पत्रात कोहलीने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या पत्रात विराट म्हणाला, ‘भारतीय संघाचे केवळ प्रतिनिधित्वच नाही, तर नेतृत्व करण्याचीदेखील संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. 

- या संपूर्ण प्रवासात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा आणि मदत करणाऱ्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. भारतीय संघातील माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती सदस्य, माझे प्रशिक्षक आणि भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाच्या पाठिंब्याशिवाय मला हे करणे शक्य झाले नसते.’

- कामाच्या ताणाबाबतही विराटने या पत्रात भाष्य केले आहे. विराट म्हणाला, ‘मी गेल्या ८ ते ९ वर्षांपासून भारतीय संघासाठी तिन्ही प्रकारांत क्रिकेट खेळतो, तसेच गेल्या ५ ते ६ वर्षांपासून कर्णधारपदही माझ्याकडे आहे. 

- या सर्व प्रकारांत खेळत असताना सातत्याने कर्णधारपद सांभाळत असताना आता मला हे वाटू लागले आहे की, मी स्वत:ला वेळ देणे गरजेचे आहे. कारण त्यामुळे मी एकदिवसीय आणि कसोटी, अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व अधिक सक्षमपणे करू शकेल. 

- टी-२० संघाचा कर्णधार म्हणून मला जे- जे शक्य झाले ते मी संघाला दिले. आता एक फलंदाज म्हणून यापुढेही माझे योगदान मी देतच राहणार आहे.’

रोहितच्या मजबूत बाजू

- क्रिकेटच्या जाणकांरांनी अनेक वर्षांपासून रोहितला टी२० चा कर्णधार बनवण्याबाबत म्हटलेले आहे. कारण या प्रकारात रोहितच्या कर्णधारपदाखाली संघाची जिंकण्याची आकडेवारी ७८.९४ अशी आहे.

- आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून रोहितने जोरदार कामगीरी केली आहे. मुंबईला पाचवेळा जेेतेपद मिळवून देण्यात रोहितने कर्णधार म्हणुन महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही रोहित एक यशस्वी कर्णधार म्हणून वेळोवेळी समोर आलाय. २०१७ मध्ये पहिल्यांदा रोहितने श्रीलंकेविरोधात कर्णधार म्हणुन भूमिका बजावली. ती मालिका भारताने २-१ ने जिंकली. यानंतर रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताने निदहास ट्रॉफी जिंकण्याची कमाल केली. त्यानंतर त्याच वर्षी आशिया चषकही भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली पटकावला.

विराटच्या निर्णयावर चाहते भावुक

विराट कोहलीने टी-२० चे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेताच ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला. अनपेक्षितपणे आलेल्या या वृत्तावर चाहते भावुक झाले. सोशल मीडियावर विराटसाठी पोस्टचा खच पडू लागला. एका चाहत्याने लिहिले, ‘मोठ्या मनाचा माणूस. असा कर्णधार ज्याने न्यूझीलंड, द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये मालिका जिंकल्या आहेत, तो नेतृत्व सोडणार! फार सुंदर टीम मॅन! वर्कलोडमुळे घेतलेला निर्णय फार चांगला म्हणावा लागेल.’

अन्य एका चाहत्याने लिहिले, ‘भारताच्या टी-२० तील सर्वांत प्रभावी कर्णधारांपैकी एक. आता विश्वचषक जिंकूनच नेतृत्व सोडावे, अशी अपेक्षा करूया. खरे सांगायचे तर हा आश्चर्याचा धक्का आहे; पण विराटने योग्य निर्णय घेतला. स्वत:ला जपण्यासाठी हा निर्णय योग्य आहे. आता तो वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये आणखी प्रभावी कामगिरी करू शकेल.’

सर्वांशी चर्चा करून घेतला निर्णय

ट्टीटरवर लिहलेल्या या पत्रात सर्वांशी चर्चा करून कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे विराटने सांगितले आहे. याबाबत पत्रात विराट म्हणतोे, “निश्चितच या निर्णय घेण्यासाठी मी बराच काळ विचार केला. या निर्णयापर्यंत पोहचण्यासाठी मी माझ्याशी जवळ असणाऱ्या व्यक्तींसोबत, रवीभाईंसोबत आणि रोहितसोबत खूप चर्चाही केली. या सर्वांची मते जाणून घेतल्यावरच मी हा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत मी बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समिती सदस्यांसोबतही बोललो आहे." 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीटी-20 क्रिकेटट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बीसीसीआय
Open in App