भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फंलदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून अनेकांना धक्का दिला. यानंतर आता आणखी एका स्टार ऑलराउंडरने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. श्रीलंकेचा स्टार खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने जवळपास १७ वर्षे श्रीलंकेच्या कसोटी संघाचे प्रतिनिधित्व केले. जेलो मॅथ्यूजची गणना जगातील दिग्गज ऑलराउंडर क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. त्याचा हा निर्णय श्रीलंकेच्या संघासाठी मोठा धक्का असेल.
निवृत्तीची घोषणा करताना अँजेलो मॅथ्यूजने त्याच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरून अत्यंत भावूक पोस्ट केली. "माझ्या आवडत्या खेळाच्या स्वरूपाला आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला निरोप देण्याची वेळ आता आली. गेल्या १७ वर्षांपासून श्रीलंकेसाठी क्रिकेट खेळणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान आहे. माझ्या कारकिर्दीच्या प्रत्येक चढ-उतारात माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या क्रिकेट चाहत्यांचा मी आभारी आहे."
तो पुढे म्हणाला की, "मी देवाचे, माझ्या आई-वडिलांचे, पत्नी आणि मुलांसह जवळच्या मित्रांचे आभार मानतो, ज्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला, मला पाठिंबा दिला. प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभे राहिले. एक अध्याय संपला आहे, पण खेळावरील प्रेम कायम राहील. जूनमध्ये बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना हा माझ्या देशासाठीचा शेवटचा रेड-बॉल सामना असेल."
अँजेलो मॅथ्यूजची कसोटी कारकिर्द
अँजेलो मॅथ्यूजने श्रीलंकेसाठी ११८ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने ४४.६२ च्या सरासरीने ८१६७ धावा केल्या आणि ३३ विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेटमध्ये अँजेलो मॅथ्यूजच्या नावावर १६ शतके आणि ४५ अर्धशतकांची नोंद आहे. त्याने २००९ मध्ये गॉल येथे पाकिस्तानविरुद्ध श्रीलंकेसाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. तर, जूनमध्ये श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जाणारा पहिला कसोटी सामना त्यांच्या कारकिर्दीतील अंतिम सामना असेल.
Web Title: After Rohit Sharma and Virat Kohli, Angelo Mathews set to retire from Tests with farewell game in June
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.