Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर पडणाऱ्या खेळाडूंची संख्या वाढतच चालली आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेचे स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीयेत. त्याच वेळी आता न्यूझीलंडलाही मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनही ( Lockie Furguson ) दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. फर्ग्युसनच्या जागी किवी संघात कोणाला संधी मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
फर्ग्युसनची चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार
लॉकी फर्ग्युसन चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी किवी संघाच्या १५ सदस्यीय संघाचा भाग होता, पण हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे त्याला स्पर्धेबाहेर करण्यात आले आहे. दुबईमध्ये खेळल्या गेलेल्या ILT20 2025 लीग दरम्यान लॉकीला दुखापत झाली होती. तो शारजाह वॉरियर्सकडून एलिमिनेटर सामन्यातही सहभागी झाला नव्हता. तसेच तो पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतही खेळू शकला नाही. त्यातच आता त्याला आगामी स्पर्धेतूनही बाहेर व्हावे लागले आहे.
लॉकी फर्ग्युसनची एकदिवसीय कारकीर्द
लॉकी फर्ग्युसनची गणना न्यूझीलंडच्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. लॉकीची एकदिवसीय कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने २०१६ मध्ये न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत, फर्गुसने ६५ एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ६४ डावांमध्ये ९९ विकेट्स घेतल्या आहेत. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये लॉकीची इकॉनॉमी ५.६८ आहे.
रचिन रवींद्र खेळणार की नाही?
न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची तिरंगी मालिका पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे. त्यात न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रविंद्र जखमी झाला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना झेल घेताना त्याला चेंडूचा नीट अंदाज आला नाही. त्यामुळे चेंडू थेट त्याच्या डोक्यावर लागला आणि भळाभळा रक्त वाहायला लागले. त्यानंतर त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले. त्यामुळे त्याच्याही खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.