सेंच्युरियन: इमाम-उल-हक याच्या शतकी खेळीनंतरही पावसाच्या व्यत्ययात झालेल्या तिसऱ्या वन डेत शुक्रवारी पाकिस्तानला द. आफ्रिकेकडून डकवर्थ- लुईस नियमानुसार १३ धावांनी पराभव पत्करावा लागला. इमामच्या १०१ धावांच्या बळावर पाकने प्रथम फलंदाजी करीत ६ बाद ३१७ अशी मजल गाठली होती. द. आफ्रिकेच्या डावात दोनदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यजमान संघ १३ धावांनी विजयी झाला.
दुसऱ्यांदा खेळ थांबल्यानंंतर पुन्हा सुरू झालाच नाही. द. आफ्रिकेने तोपर्यंत ३३ षटकात २ बाद १८७ अशी वाटचाल केली होती. त्यावेळी डकवर्थ- लुईस नियमांतर्गत बरोबरीसाठी १७४ धावांचीच गरज होती. रेझा हेन्ड्रिक्स याने नाबाद ८३ तसेच कर्णधार फाफ डुप्लेसिस याने नाबाद ४० धावांचे योगदान दिले.
इमामने १९ व्या वन डेत पाचवे शतक ठोकून टीकाकारांना चोख उत्तर दिले. त्याने डावाची सुरुवात करीत ११६ चेंडूत ८ चौकार ठोकले. बाबर आझमने ६९ तसेच मोहम्मद हफीजने ५२ धावा केल्या. या दोघांनी तिसºया गड्यासाठी १०८ धावांची भागीदारी केली. द. आफ्रिकेकडून डेल स्टेन आणि कासिगो रबाडा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या विजयामुळे द. आफ्रिकेने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळविली आहे.(वृत्तसंस्था)