Join us

काल रडला अन् आज पंतप्रधानांसोबतच्या चर्चेनंतर निर्णय बदलला; कर्णधाराने निवृत्ती घेतली मागे

बांगलादेशच्या वन डे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल ( Tamim Iqbal) याने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 17:57 IST

Open in App

भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. सर्व संघ या स्पर्धेसाठी सज्ज होत असताना बांगलादेश क्रिकेटमध्ये भूकंप झाल्याचे पाहायला मिळालेले. बांगलादेशच्या वन डे संघाचा कर्णधार तमिम इक्बाल ( Tamim Iqbal) याने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली होती. इक्बालने १६ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दिचा शेवट करण्याचा निर्णय आताच का घेतला हा प्रश्न सर्वांना पडला होता. पण, २४ तासांच्या आत त्याने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. बांगलादेशच्या पंतप्रधान हसिना शेख यांनी चर्चा केल्यानंतर तमिमने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या उर्वरित वन डे सामन्यांसाठी लिटन दास याची कर्णधार म्हणून निवड केली गेली होती. 

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यातील पराभवानंतर तमिमने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. पत्रकारांना सामोरे जाताना तमिम प्रचंड भावूक झाला होता. ३४ वर्षीय तमिमने मागच्या वर्षी ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती आणि त्याआधी तो एप्रिल महिन्यात आयर्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळला होता. २००७ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तमिमने वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध मॅच विनिंग अर्धशतक झळकावले होते. त्याने वन डे क्रिकेटमध्ये १४ शतकांसह ८३१३ धावा केल्या आहेत आणि सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यानंतर तमिमचा क्रमांक येतो. 

कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७० सामन्यांत ३८.८९ च्या सरासरीने १० शतकांसह ५१३४ धावा केल्या आहेत.  तमिमच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने ३७ पैकी २१ वन डे सामने जिंकले आहेत. 

वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशचे वेळापत्रक७ ऑक्टोबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, धर्मशाला१० ऑक्टोबर - इंग्लंड वि. बांगलादेश, धर्मशाला१४ ऑक्टोबर - न्यूझीलंड वि. बांगलादेश, चेन्नई१९ ऑक्टोबर - भारत वि. बांगलादेश, पुणे२४ ऑक्टोबर - दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश, मुंबई२८ ऑक्टोबर- श्रीलंका वि. बांगलादेश, कोलकाता३१ ऑक्टोबर - पाकिस्तान वि. बांगलादेश, कोलकाता६ नोव्हेंबर - बांगलादेश वि. नेदरलँड्स, दिल्ली१२ नोव्हेंबर - ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश, पुणे 

टॅग्स :बांगलादेशवन डे वर्ल्ड कप
Open in App